कोल्‍हापूर : सहायक निबंधक कार्यालयात शुक्रवारी दुबार ठराव आलेल्‍या दूध संस्‍थांच्‍या सुनावणीस शांततेत सुरुवात झाली. 
कोल्हापूर

Gokul Dubbar Resolution Hearing | चेअरमन-सचिवांची गट्टी; संचालक मंडळ विरोधात

दुबार ठराव सुनावणीदरम्‍यानचे चित्र; चार संस्‍थाच्‍या संचालकांचा ठराव ग्राह्य

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : दुबार ठरावांच्‍या सुनावणी दरम्‍यान चार दूध संस्‍थांमध्‍ये चेअरमन, सचिवांची गट्टी, तर संपूर्ण संचालक मंडळ विरोधात असे चित्र दिसून आले. यामध्‍ये संचालकांचे बहुमत झाल्‍याने त्‍यांचा ठराव ग्राह्य धरण्‍यात आला. आठ संस्‍थांमध्‍ये समझोता झाल्‍याने त्‍यांनी स्‍वत:हून एक ठराव मागे घेतला. तसेच तीन संस्‍थांच्‍या वतीने वकिलांनी बाजू मांडली. सुनावणीची प्रक्रिया शांततेत सुरू झाली.

गोकुळ निवडणुकीसाठी पात्र ठरलेल्‍या ४,८४४ संस्‍थांकडून ठराव मागविण्‍यात आले. मुदतीत ५,४३९ ठराव सहायक निंबधक कार्यालयात दाखल झाले. यामध्ये ५६ संस्‍थांचे ठराव दुबार होते. त्‍यामुळे या संस्‍थांची सुनावणी घेऊन एक ठराव ग्राह्य धरला जाणार आहे. त्‍यानुसार शुक्रवारपासून (दि. १०) सहायक निंबधक कृष्‍णा ठाकरे यांनी सुनावणी घेण्‍यास सुरुवात केली आहे. दिवसभरात १५ संस्‍थांची सुनावणी पूर्ण झाली.

सुनावणीदरम्‍यान चंदगड तालुक्‍यातील मजरे-कारवे येथील देवगोसावी, कसबा वाळवे (ता. राधानगरी) येथील रयत दूध संस्‍थेसह अन्‍य दोन संस्‍थांच्‍या संचालकांनी चेअरमन यांनी विश्‍वासात न घेता परस्‍पर ठराव दिल्‍याची तक्रार केली. संचालकांचे बहुमत झाल्‍याने संचालकांचा ठराव ग्राह्य धरण्‍यात आला. कागल तालुक्‍यातील तीन, शिरोळमधील दोन आणि चंदगडमधील एका दूध संस्‍थेच्‍या संचालकांमध्‍ये समझोता झाल्‍याने सुनावणीपूर्वीच त्‍यांच्‍यामधील वाद मिटला.

करवीर तालुक्‍यातील भुयेवाडी येथील भैरवनाथ दूध संस्‍थेतील ठराव बिगर सभासद व्‍यक्‍तीच्‍या नावावर असल्‍याचे संस्‍थेच्‍या संचालकांनी ठाकरे यांच्‍या निदर्शनास आणून दिले. तसेच ज्‍याच्‍या नावे ठराव आहे, ती व्‍यक्‍ती सुनावणीस अनुपस्‍थित राहिल्‍याने संचालकांचा ठराव ग्राह्य धरण्यात आला. चंदगड तालुक्‍यातील कळसगादी येथील विष्‍णू अण्‍णा दळवी महिला दूध संस्‍थेच्‍या सुनावणी दरम्‍यान संचालकांमध्‍ये किरकोळ वादावादीचा प्रकार घडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT