Gokul Election | गोकुळ : ‘समविचारी’समोर ‘महायुती’चे तगडे आव्‍हान 
कोल्हापूर

Gokul Election : ‘गोकुळ’च्या रणांगणात नात्यागोत्यातच लढाई!

तब्बल २० उमेदवार एकमेकांचे नातेवाईक

पुढारी वृत्तसेवा

आशिष पाटील

गुडाळ : ‘गोकुळ’च्या प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली असून दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांवर नजर टाकली असता एकूण तब्बल वीस उमेदवार एकमेकांचे जवळचे नातेवाईक असल्याचे दिसून येते. त्यामुळे गोकुळची लढाई ही नात्यागोत्यातच होत असल्याचे चित्र आहे.

आ. सतेज पाटील यांनी अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलेले शशिकांत पाटील-चुयेकर आणि महायुतीच्या पॅनलेमधून विरोधात लढणारे प्रताप पाटील-कावणेकर हे नात्याने सख्खे मेहुणे-पाहुणे आहेत. महायुतीकडून लढत असलेले माजी आमदार राजेश पाटील यांचे सख्खे भाचे वीरेंद्र मंडलिक त्यांच्याच पॅनेलचे उमेदवार असले, तरी मामेभाऊ विशाल गोपाळराव पाटील हे विरोधातील आ. सतेज पाटील यांच्या आघाडीचे उमेदवार आहेत. ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे हे महायुतीमधून, तर त्यांच्या सून आणि पुतणे धीरज डोंगळे यांच्या पत्नी भाग्यश्री डोंगळे या आ. सतेज पाटील यांच्या आघाडीतून लढत आहेत.

जि. प.चे माजी अध्यक्ष राहुल पाटील हे महायुती पॅनेलकडून, तर त्यांचे चुलत बंधू गोकुळचे माजी संचालक उदय पाटील हे आ. सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीतून लढत आहेत. या पाटील बंधूंचे भाऊजी असलेले अमर पाटील (कोडोलीकर) महायुतीमधून लढत आहेत. माजी संचालक अंबरिष घाटगे महायुतीचे उमेदवार असले, तरी त्यांचे चुलत सासरे विश्वासराव इंगवले, आ. पाटील आघाडीचे उमेदवार आहेत, तर घाटगे यांच्या नात्याने भगिनी असलेल्या शौमिका महाडिक या महायुतीच्या उमेदवार आहेत. माजी अध्यक्ष विश्वास पाटील आणि त्यांचे व्याही माजी संचालक युवराजबापू पाटील हे महायुती पॅनेलमध्ये एकत्र आहेत. ‘केडीसीसी’चे संचालक रणजित पाटील आणि त्यांच्या आत्या ‘केडीसीसी’च्या माजी संचालिका अर्चना ए. वाय. पाटील महायुती पॅनेलमधून एकत्र लढत आहेत. माजी संचालक चेतन नरके आणि अजित नरके हे चुलत बंधू महायुती पॅनेलमधून लढत आहेत.

निकालानंतर ‘कही खुशी कही गम’

महायुती पॅनेलमधील १५ उमेदवार एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत, तर आ. सतेज पाटील यांच्या आघाडीचे पाच उमेदवार महायुती पॅनेलच्या उमेदवारांच्या नातेसंबंधातील आहेत. एकंदरीत गोकुळच्या रणांगणावर होणारी निवडणूक नात्यागोत्यातच होत असल्याने निकालानंतर ‘कही खुशी कही गम’ असे वातावरण राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT