कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’साठी रविवारी (दि. १८) मतदान होत आहे. मतदान, मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यांत ३५ मतदान केंद्रे असणार आहेत. या केंद्रांवर ५४१८ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. रमणमळा येथील निवडणूक कार्यालयात शनिवारी निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
गोकुळच्या संचालक पदाच्या २५ जागांसाठी ५० उमेदवार रिंगणात आहेत. छ. शाहू शेतकरी विकास आघाडी आणि राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीमध्ये थेट लढत होत आहे. १८ ऑक्टोबरला मतदान तर १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. प्रशासनाकडून मतदान व मतमोजणी प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे. गोकुळच्या निवडणुकीत पाच स्वतंत्र मतपत्रिकांचा वापर केला आहे. सर्वसाधारण गटासाठी पांढरी, महिला प्रतिनिधींसाठी गुलाबी, इतर मागास प्रवर्गासाठी फिकट हिरवी, भटके विमुक्तसाठी फिकट पिवळी, तर अनुसूचित जाती-जमातीसाठी फिकट निळ्या रंगाची मतपत्रिका असेल. मतदान प्रक्रियेसाठी ३५ केंद्राध्यक्ष, २१० मतदान अधिकारी आणि ३५ शिपाई नियुक्त केले आहेत. याशिवाय एक राखीव केंद्राध्यक्ष, ३० राखीव मतदान अधिकारी आणि पाच राखीव शिपायांची व्यवस्था केली आहे.
सोमवारी ३२ टेबलांवर मतमोजणी
गोकुळसाठी सोमवारी (दि. १९) ३२ टेबलांवर मतमोजणी होईल. सकाळी आठ वाजता रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल.