गडहिंग्लज : गोकुळच्या म्हशीच्या दुधाला वाढती मागणी असल्याने म्हैस दूध संकलन मोठ्या प्रमाणात वाढविण्याची गरज आहे. अमूल डेअरीला टक्कर द्यायची असेल, तर दूध संकलन वाढलेच पाहिजे. 25 लाख लिटर संकलनाचा टप्पा सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
गोकुळ व एन.डी.डी.बी. डेअरी सर्व्हिसेस, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या लिंगनूर (ता. गडहिंग्लज) येथे जातिवंत मुर्हा, मेहसाणा, जाफराबादी म्हैस विक्री केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आ. सतेज पाटील म्हणाले, गोकुळ दूध संघाच्या दूध संकलन वाढवण्यासाठी नेहमी प्रयत्न सुरू आहेत. अल्पभूधारक शेतकर्यांना परराज्यात जाऊन जनावरे खरेदी करणे परवडत नसल्यामुळे गोकुळने जातिवंत म्हैस खरेदी-विक्री केंद्र चालू केले आहे. दूध व्यवसाय नेहमीच फायदेशीर राहतो. त्याकडे नोकरीला पूरक व्यवसाय म्हणून पाहण्याची द़ृष्टी बदलणे आवश्यक आहे. आजरा, चंदगड व गडहिंग्लज तालुक्यांमध्ये म्हैस दूध संकलनाचे प्रमाण जास्त आहे. संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, गोकुळ व एन.डी.डी.बी. यांनी संयुक्तपणे उभे केलेल्या या जातिवंत म्हैस विक्री केंद्रामध्ये दूध उत्पादक शेतकर्यांना जातिवंत, दुधाळ व सशक्त म्हशी उपलब्ध होणार असून यामुळे म्हैस दूध उत्पादनवाढीला निश्चितच चालना मिळणार आहे.
एन.डी.बी.बी.चे प्रतिनिधी डॉ. सरोज वाहणे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक संचालिका श्रीमती अंजना रेडेकर यांनी केले. आभार संचालक शशिकांत पाटील-चुयेकर यांनी मानले. यावेळी आ. रजेश पाटील, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगले, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, राजेंद्र मोरे, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, एन.डी.बी.बी.चे प्रतिनिधी डॉ. मोहम्मद तारिक, डॉ. बालाजी वडजे, संघाचे अधिकारी, पंचक्रोशीत दूध संस्थांचे प्रतिनिधी, दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोकुळने उत्पादकांचे हित जोपासले
आरोग्यमंत्री व पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, गोकुळने नेहमीच उत्पादकांचे हित जोपासले आहे. त्याचा एक भाग म्हणून जातिवंत म्हैस विक्री केंद्र उभारले आहे. गोकुळने सहकार क्षेत्रात आर्थिक क्रांती घडवली आहे. गोकुळच्या या उपक्रमामुळे उत्पादकांचे हित संरक्षित राहणार असून, दूध व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल तसेच शहरी-ग्रामीण भागामधील आर्थिक समन्वय वाढेल.