कोल्हापूर : गोकुळच्या प्रारूप मतदार यादीवरील हरकतींचा निकाल दिल्यानंतर मंत्री मुश्रीफ व महाडिक गटातील वाद उफळला आहे. निकालावरून सहायक निबंधक कार्यालयात सोमवारी रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटांचे समर्थक आमने-सामने असल्याने महायुतीमधील गटबाजी आता उघड झाली आहे. मतदार यादीतून अपात्र ठरलेल्या ६३९ संस्थांचा फटका हा मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह माजी चेअरमन विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांना बसणार आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक नारायण परजणे यांनी गोकुळच्या प्रारूप यादीतील ७८९ संस्थांचे ठराव अपात्र ठरवले. यानंतर मंत्री मुश्रीफ, आ. नरके गटाच्या संस्था प्रतिनिधींनी निकालावर आक्षेप घेतला . यानंतर रात्री उशिरा कार्यक्षेत्राबाहेरील अपात्र ठरवलेल्या १५० संस्था पात्र ठरविल्या.
मंत्री मुश्रीफ, पाटील, डोंगळेंच्या संस्था टार्गेट
अपात्र केलेल्या संस्थांमध्ये बहुतांश संस्था कागल, करवीर, राधानगरी तालुक्यातील आहेत. तिन्ही तालु्क्यांत मंत्री मुश्रीफ, आ. चंद्रदीप नरके, माजी आ. के. पी. पाटील, माजी चेअरमन विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांच्या संस्था सर्वाधिक आहेत.
राधानगरी तालुक्यातील सर्वाधिक संस्था पात्र
कार्यक्षेत्राबाहेरील ३२५ ठराव अपात्र ठरविण्यात आले होते. या ठरावांची फेर पडताळणी करताना १५० ठराव पात्र ठरविले. पात्र ठरविलेल्या ठरावांमध्ये सर्वाधिक ठराव राधानगरी तालुक्यातील आहेत. त्यामुळे गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.
महायुतीमध्ये वाद, विरोधक प्रचारात
गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढणार आणि महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होणार, असे मंत्री मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून वारंवार सांगितले जात आहे; मात्र अंतर्गत बाजू पाहता दोन्ही गटांत गोकुळच्या सत्ताकारणावरून कुरघोड्या सुरू आहेत. दुसरीकडे महायुतीच्या विरोधात असणारे आमदार सतेज पाटील हे या सर्व प्रकारापासून तसे अलिप्त आहेत. त्यांच्या फार कमी संस्था या प्रक्रियेत असल्याने त्यांनी प्रचारावर लक्ष केंद्रित केले आहे.