कोल्हापूर : १. महायुतीचे ठरावधारक मतदान केंद्रावर शक्तिप्रदर्शन करत दाखल झाले. यावेळी आ. चंद्रदीप नरके, विश्‍वास पाटील, शौमिका महाडिक, राहुल पाटील उपस्‍थित होते. २. विरोधी समविचारी आघाडीचे ठरावधारक माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मतदान केंद्रावर शक्तिप्रदर्शन करत दाखल झाले.  
कोल्हापूर

Gokul Dairy Election | शक्‍तिप्रदर्शन, ईर्ष्या अन् हुरहुर

दोन्‍ही आघाड्यांचे मतदार समूहाने मतदान केंद्रांवर दाखल; ठरावधारकांच्या टोप्‍यांनी वेधले लक्ष

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गोकुळ दूध संघासाठी रविवारी झालेल्‍या मतदान प्रक्रियेदरम्‍यान महायुती आणि समविचारी आघाडीचे नेते, ठरावधारक आणि कार्यकर्त्यांनी केलेल्‍या शक्तिप्रदर्शनातून राजकीय चुरस दिसून आली. तसेच उमेदवारांच्‍या चेहर्‍यावर विजयाची हुरहुर स्‍पष्‍ट दिसून येत होती.

प्रतिष्ठेच्या लढाईत दोन्ही आघाड्यांचे ठरावधारक समूहाने मतदान केंद्रांवर दाखल झाले. आपले नेते आणि आघाडीच्‍या विजयाच्‍या घोषणा देत कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राचा परिसर दणाणून सोडला. दोन्‍ही आघाडीच्‍या ठरावधारकांनी परिधान केलेल्‍या गांधी टोप्‍यांनी लक्ष वेधले. तर नेत्‍यांच्‍या भेटी, घोषणाबाजी, राजकीय टोलबाजीतून जिल्‍ह्यातील सर्वच ३५ मतदान केंद्रांवर राजकीय माहोल निर्माण झाला होता.

मतदान केंद्रांपासून काही अंतरावर दोन्ही आघाड्यांचे कार्यकर्ते बूथ लावून बसले होते. संबंधित तालुक्यांतील उमेदवारही मतदान केंद्राबाहेर ठाण मांडून होते. महायुतीचे उमेदवार आणि ठरावधारक गांधी टोपी परिधान करून मतदानासाठी दाखल झाले. त्‍यांच्‍या टोपीवर कपबशीचे छायाचित्र होते. तर समविचारी आघाडीच्या ठरावधारकांनी शिट्टी चिन्ह असलेल्या गांधी टोप्या घालून लक्ष वेधले.

शिट्टी वाजली अन्‌...

करवीर तालुक्‍याच्‍या स्‍वामी विवेकानंद कॉलेज येथील मतदान केंद्रावरून काही अंतरावर दोन्‍ही आघाड्यांचे समोरा-समोर बूथ होते. सकाळी अकरा वाजण्‍याच्‍या सुमारास आ. सतेज पाटील समविचारी आघाडीच्‍या बूथमध्‍ये बसले होते. यावेळी आ. चंद्रदीप नरके, गोकुळचे माजी संचालक विश्‍वास पाटील, शौमिका महाडिक, जि.प.चे माजी अध्‍यक्ष राहुल पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली महायुतीचे ठरावधारक मतदान करण्‍यासाठी शक्तिप्रदर्शनाने दाखल झाले. बूथसमोर महायुतीचे ठरावधारक येताच समविचारीच्‍या समर्थकांनी शिट्टी वाजविण्‍यास सुरुवात केली अन् येथे राजकीय ईर्ष्या निर्माण झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT