कोल्हापूर : विरोधकांच्या हातातून गोकुळ दूध संघाची निवडणूक गेल्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. त्या भ्रमनिरासातूनच ते खोट्यानाट्या अफवा पसरवून नॅरेटिव्ह तयार करीत आहेत. ते जेवढ्या अफवा आणि नॅरेटिव्ह पसरवतील, तेवढी महायुतीची वज्रमूठ अधिकच घट्ट होईल, असा विश्वास गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष विश्वासराव नारायण पाटील (आबाजी) यांनी व्यक्त केला.
शिरोली दुमाला (ता. करवीर) येथून करवीर तालुक्यातील शंभरहून अधिक ठरावधारकांना देवदर्शनासाठी सहलीवर रवाना केले. या गाड्यांचे पूजन दूध संघाचे माजी संचालक युवराज पाटील (बापू) यांच्यासह विश्वास नारायण पाटील, नविद मुश्रीफ आदी प्रमुखांच्या हस्ते झाले.
गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष नविद मुश्रीफ म्हणाले, काल करवीर तालुक्याच्या ठरावधारकांच्या मेळाव्यात पुईखडी येथील संकल्प सिद्धी हॉलमध्ये व्यासपीठावर मी आणि बाळासाहेब खाडे जवळजवळच बसलो होतो; परंतु आमच्यात मतभेद होऊन वाद झाल्याच्या खोट्या बातम्या ते पसरवत आहेत. असल्या घाणेरड्या व विकृत प्रकाराने विरोधकांच्या हाती काहीही लागणार नाही. माजी संचालक बाळासाहेब खाडे म्हणाले, मी आणि माजी अध्यक्ष नविद मुश्रीफ आम्हा दोघांमध्ये सख्ख्या भावासारखे आपुलकीचे, आत्मियतेचे ऋणानुबंध आहेत. आमच्यामध्ये मतभेद होऊन कधी वाद झाला, हे विरोधकांनी सिद्ध करावे. उपस्थित ठरावधारकांनी महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला पॅनेल टू पॅनेल मतदान करणार करून ऐतिहासिक मताधिक्यांनी विजयी करण्याचा निर्धार केला. तसेच, छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
खटाटोप वाया जातील!
पाटील म्हणाले, विरोधक हताश झाले आहेत. त्या नैराश्यापोटीच ते कधी महायुतीमध्ये भांडणतंटे सुरू असल्याचे, तर कधी मतभेद असल्याचे गैरसमज व अफवा वेगवेगळ्या माध्यमातून पसरवत आहेत. त्यांचे हे सगळे खटाटोप वाया जाणार आहेत.