कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळचा प्रचार आज शनिवारी थांबणार आहे. सकाळी आठ वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. रविवारी (दि.१८) मतदान असल्याने शनिवारी रात्रभर मतांचा खेळ चालणार आहे. त्यामुळे गोकुळसाठी शनिवारची रात्र वैर्याची असणार आहे. दरम्यान आतापर्यंत सहलीवर गेलेले सर्व ठरावधारकही शनिवारी रात्री कोल्हापुरात दाखल होणार आहेत.
गोकुळसाठी शनिवारी मतदान होणार आहे. छ. शाहू शेतकरी विकास आघाडी विरुद्ध राजर्षी शाहू समविचारी आघाडीमध्ये थेट लढत होत आहे. दोन्ही आघाड्यांनी पॅनेलची घोषणा केल्यानंतर प्रचारासाठी दोन्ही पॅनेलनी घटस्थापनेचा मुहूर्त साधला. महायुतीच्या पॅनेलने महासैनिक दरबार हॉल येथे तर समविचारी आघाडीचा प्रचार मेळावा चुये (ता. करवीर) येथे झाला. यानंतर गेली सहा दिवस दोन्ही आघाड्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मात्र आज सकाळी आठ वाजता या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी शांत होणार असून गुप्त प्रचाराला गती येणार आहे.
दोन्ही आघाड्यांचा खडा पहारा
सकाळी प्रचार थांबल्यानंतर गोकुळसाठी दोन्ही आघाड्यांकडून गुप्त प्रचाराला सुरुवात होणार आहे. काही ठरावधारक सहलीला गेले आहेत. तर काही गावामध्येच थांबून आहेत. अशा ठरावधारकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न उमेदवारांचा असणार आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांच्या प्रमुख कार्यककर्त्यांचा विरोधकांवर खडा पहारा असणार आहे.