Gokul Election | ‘गोकुळ’च्‍या १८०० दूध संस्‍थांची होणार चौकशी  
कोल्हापूर

Gokul Election | ‘गोकुळ’च्‍या १८०० दूध संस्‍थांची होणार चौकशी

सहायक निबंधकांनी घेतली प्रशासक मंडळाची भेट : २०२१ नंतर नोंदणी झालेल्‍या दूध संस्‍थांची मागविली माहिती

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ, गोकुळ सलग्‍न १८०० दूध संस्‍थांची आता चौकशी होणार आहे. सहायक निबंधक कृष्‍णा ठाकरे यांनी गुरुवारी (दि. २) प्रशासक मंडळातील सदस्‍य सुनील धायगुडे, सागर बलकवडे यांची गोकुळ शिरगाव येथील कार्यालयात भेट घेतली. त्‍यांच्‍याकडे २०२१ नंतर नोंदणी झालेल्‍या दूध संस्‍थांची माहिती त्‍यांनी मागविली आहे. पुढील चार दिवसांत माहिती उपलब्‍ध करून दिली जाईल, असे धायगुडे, बलकवडे यांनी सांगितले.

तत्‍कालीन विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी ‘गोकुळ’कडे २०२१ नंतर नोंदणी झालेल्‍या दूध संस्‍थांची चौकशी करण्‍यासाठी सहायक निबंधक कृष्‍णा ठाकरे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली त्रिसदस्‍यीय समिती नियुक्‍त केली. मात्र, नियुक्‍ती दरम्‍यान ठाकरे अवसायन प्रक्रियेतील दूध संस्‍थांची सुनावणी त्‍यानंतर गोकुळ निवडणुकीसाठी दूध संस्‍थांकडून ठराव मागविण्‍याच्‍या प्रक्रियेत व्‍यस्‍त होते. त्‍यामुळे त्‍यांना याबाबत कार्यवाही करता आली नाही. या दोन्‍ही प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर गुरुवारी त्‍यांनी ‘गोकुळ’च्या प्रशासक मंडळाची भेट घेऊन त्‍यांच्‍याकडे दूध संस्‍थांची माहिती मागितली आहे. त्‍यामुळे आता २०२१ नंतर नोंदणी झालेल्‍या दूध संस्‍था चौकशीच्‍या फेर्‍यात येणार आहेत.

‘त्‍या’ ४२७ दूध संस्‍थांची चौकशी होणार नाही

विभागीय उपनिबंधक यांनी ४२७ दूध संस्‍थांची चौकशी करण्‍यासाठी यापूर्वीच द्विसदस्‍यीय समिती नियुक्‍त केली होती. समितीने या संस्‍थांची चौकशी करून अहवाल सादर केला. यानंतर विभागीय उपनिबंधक यांनी ४२७ पैकी १७ संस्‍था पात्र ठरवत ४१० संस्‍थांचे सभासदत्त्‍व रद्द करण्‍याचे निर्देश ‘गोकुळ’ला दिले. या संस्‍थांची नोंदणी २०२१ नंतरची असल्‍याने व या संस्‍थांची चौकशी पूर्ण झाल्‍याने ठाकरे यांच्‍या अध्‍यक्षतेखालील समितीकडून या ४२७ संस्‍था वगळून अन्‍य संस्‍थांची चौकशी केली जाणार आहे.

अवसायनातील २१६ दूध संस्‍थांची आज पुण्‍यात सुनावणी

विभागीय उपनिबंधक देविदास मिसाळ यांची संबंधित संस्‍थांना नोटीस अवसायनात गेलेल्‍या ६४४ दूध संस्‍थांपैकी आमदार सतेज पाटील गटाने दाखल केलेल्‍या ९३ आणि अन्‍य १२३ अशा एकूण २१६ दूध संस्‍थांची शुक्रवारी (दि. ३) विभागीय उपनिबंधक देविदास मिसाळ यांच्‍यासमोर सुनावणी होत आहे. संबंधित संस्‍थांना विभागीय उपनिबंधक कार्यालयाकडून सुनावणीस उपस्‍थित राहण्‍याबाबत नोटीस दिली आहे. आमदार सतेज पाटील गटाने दाखल केलेल्‍या दूध संस्‍थांच्‍या वतीने ॲड. के. डी. पवार आणि ॲड. संजय सरदेसाई, तर अन्‍य १२३ दूध संस्‍थांच्‍या वतीने ॲड. प्रबोध पाटील बाजू मांडणार आहेत.

दूध संस्‍था ठरावांच्‍या छाननी प्रक्रियेला सुरुवात

कोल्‍हापूर : ‘गोकुळ’साठी दूध संस्‍थांनी दाखल केलेल्‍या ठरावांच्‍या छाननी प्रक्रियेला गुरुवारी (दि. २) सुरुवात झाली. सहायक निबंधक कार्यालयात दिवसभर तालुकानिहाय तपासणी करण्‍यात आली, तर ५६ दुबार ठराव आलेल्‍या संस्‍थांना सोमवारपासून (दि. ६) सुनावणीसाठी नोटीस पाठविली जाणार असल्‍याची माहिती सहायक निबंधक कृष्‍णा ठाकरे यांनी दिली.

सहायक निबंधक कार्यालयात ‘गोकुळ’ निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी तयार करण्‍यासाठी ५,४३९ दूध संस्‍थांचे ठराव प्राप्‍त झाले आहेत. ‘गोकुळ’ने सादर केलेल्‍या सभासदांच्‍या यादीमधील ४,८४४ संस्‍था सभासद सद्यस्‍थितीत पात्र आहेत. प्राप्‍त झालेल्‍या ठरावांची छाननी सुरू झाली आहे. छाननी दरम्‍यान दुबार, एकाच व्‍यक्‍तीच्‍या नावे अनेक ठराव, अवसायनात गेलेल्‍या दूध संस्‍था, अर्हता दिनांक नंतर नोंदणी होऊनही ठराव सादर केलेल्‍या संस्‍था, ‘गोकुळ’शी संलग्‍न नसूनही ठराव दाखल केलेल्‍या दूध संस्‍थांचे ठराव बाजूला केले जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT