कोल्हापूर

Gokul Politics | हलाल सर्टिफिकेटवरून तापले ‘गोकुळ’चे राजकारण

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘गोकुळ’ने घेतलेल्या हलाल सर्टिफिकेटवरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. गोकुळ दूध, दुग्धजन्य पदार्थांचा देशांतर्गत बाजारपेठेत पुरवठा कमी पडत आहे, मग आखाती बाजारपेठेची गोकुळला गरज कशासाठी, असा सवाल तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांनी उपस्थित केला आहे. तर हलालच्या वादात आता हिंदुत्ववादी संघटनांनीही उडी घेतली असून, त्यांनी हलाल सर्टिफिकेट रद्द करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील निवेदन ते शुक्रवारी प्रशासक मंडळाला देणार आहेत.

गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हलाल सर्टिफिकेटचा मुद्दा समोर आला आहे. यामुळे सध्या राजकीय वातावरण आणखी तापले आहे. तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांनी हलाल सर्टिफिकेटला संविधानिक मान्यता नसताना गोकुळला हलाल सर्टिफिकेटची गरज का भासली, असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच गोकुळकडून आखाती देशांमध्ये दुग्धजन्य पदार्थ पाठविण्यासाठी हलाल सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे, असे सांगितले जात आहे. मात्र, गोकुळला अजून पुणे, मुंबई, गोवा येथून मोठी मागणी आहे. या बाजारपेठेत पूर्ण क्षमतेने दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा करू शकत नाही. गोकुळचे कोणतेही उत्पादन पडून नाही, मग गोकुळला आखाती देशांमधील बाजारपेठ कशासाठी हवी आहे, असा प्रश्न बेलवाडे यांनी केला आहे.

सर्टिफिकेट लपून-छपून का घेतले?

संचालक मंडळ म्हणजे गोकुळ नव्हे, सर्वसामान्य दूध उत्पादक, खरेदीदार यांचे गोकुळ आहे. सर्टिफिकेट घेताना त्यांना विचारले का? सर्वसाधारण सभेत हलाल सर्टिफिकेटचा मुद्दा का मांडला नाही. हे सर्टिफिकेट लपून-छपून घेण्याची गरज काय होती, असाही प्रश्न बेलवाडे यांनी केला आहे.

हिंदुत्ववादी संघटना आज देणार निवेदन

गोकुळने घेतलेले हलाल सर्टिफिकेट रद्द करा, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन समस्त हिंदुत्ववादी संघटनांकडून शुक्रवारी (दि.29) सकाळी 11 वाजता ताराबाई पार्क येथील कार्यालयात प्रशासक मंडळाला देण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT