गडहिंग्लज : गोकुळवर प्रशासक आणत नाही तोवर स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका घेऊन चंदगडचे आ. शिवाजी पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात मोहीम सुरू केली होती. सुरुवातीला या प्रक्रियेत मुश्रीफांच्याच कागल मतदारसंघातील उत्तूर जिल्हा परिषदेमधील प्रकाश बेलवाडे यांनी शड्डू ठोकला होता. बेलवाडेंनी तक्रार केल्यानंतर त्यांना अगदी हलक्यात घेतलेल्या गोकुळच्या कारभाऱ्यांना थेट प्रशासक आल्यावर बेलवाडे किती डोईजड आहेत याची कल्पना आली.
बेलवाडेंनी सुरू केलेल्या मोहिमेला आ. शिवाजी पाटील यांचे बळ मिळाले अन् बघता बघता गोकुळवर प्रशासक आले. महायुतीचे सरकार असूनही गोकुळवर प्रशासक येण्यापासून रोखण्यात मुश्रीफ पिछाडीवर पडले. यामुळे गेल्या दोन महिन्यापासून मुश्रीफ विरुद्ध प्रकाश बेलवाडे व मुश्रीफ विरुद्ध आ. शिवाजी पाटील यांच्यातील सुरू असलेल्या घमासानमध्ये बेलवाडे व आ. पाटील वरचढ ठरले.
मुश्रीफ व प्रकाश बेलवाडे यांच्यातील वैर अनेक वर्षांपासून सुरू आहे. मुश्रीफांच्या कागल मतदारसंघातील उत्तूर जिल्हा परिषदेमधील वडकशिवाले गावचे असलेले बेलवाडे हे मुश्रीफांना अनेक वर्षांपासून विरोध करत आले आहेत. मुश्रीफांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध कामांच्या चौकशी लावून त्यांनी आपला विरोधाचा इरादा स्पष्ट केला आहे. पूर्वी मुश्रीफांच्या विरोधात ते भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशा भूमिकेतून लढत होते. त्यानंतर महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी सामील झाली. मात्र बेलवाडेंनी आपली विरोधाची तलवार म्यान होऊ न देता त्याची धार आणखी वाढवली. यातूनच मग गोकुळच्या वाढीव संस्थांच्या विरोधात त्यांनी लढाई सुरू केली. निवडणूक पुढे ढकलण्यापासून ते गोकुळवर प्रशासक आणेपर्यंत ते मागे हटले नाहीत.
बेलवाडेंची लढाई सुरू असताना आ. शिवाजी पाटील यांनी यामध्ये एन्ट्री घेत मुश्रीफांना प्रखर विरोध दर्शवला. गोकुळच्या कारभारावर सडकून टीका करताना भष्टाचाराचे आरोप करत प्रशासक येईपर्यंत आपण गप्प बसणार नाही, अशीच भूमिका घेतली. यावर न थांबता त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करत प्रशासक आणूनच दाखवला. यामुळे आ. पाटील विरुद्ध मुश्रीफ ही जिल्हा परिषदेला सुरू झालेली लढाई गोकुळमध्ये येऊन टोकाची झाली. यामुळे अलीकडे गोकुळच्या राजकारणाचे केंद्रच उत्तूर व चंदगड राहिले आहे.
बेलवाडे कोण आहेत?
मेकॅनिकल इंजिनिअर असलेले प्रकाश बेलवाडे हा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता. 2016 मध्ये मुंबईहून ते आजरा तालुक्यातील त्यांच्या वडकशिवाले गावी आले. तत्पूर्वी मुंबईत अभाविपच्या माध्यमातून ते भाजप नेत्यांच्या संपर्कात आले. 2014 मध्ये ओडिशाचे धर्मेंद्र प्रधान केंद्रीय मंत्री बनले. त्यांचे ओएसडी म्हणून काम करण्याची बेलवाडे यांना संधी मिळाली. यानंतर 2017 मध्ये त्यांनी गावातील राजकारणात प्रवेश करत ग््राामपंचायतीची निवडणूक जिंकली व ते सरपंच झाले. येथून त्यांची जिल्ह्यातील राजकीय कारकीर्द सुरू झाली. मंत्री मुश्रीफ यांच्या माणसांसोबत त्यांचे राजकीय वैर यामधून सुरू झालेला संघर्ष आज गोकुळपर्यंत पोहोचला आहे. सध्या ते चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांचे निकटवर्तीय आहेत.
मुश्रीफ, आ. पाटील यांचे आव्हान - प्रतिआव्हान!
गोकुळच्या राजकारणातूनच मुश्रीफांवर आ. शिवाजी पाटील यांनी आरोप करताना सडकून टीका केली. या टीकेला उत्तर देताना मुश्रीफांनी त्यांचा इतिहास काढू, अशी भूमिका घेतली तर आ. पाटील यांनी माझा इतिहास काढाच, असे प्रतिआव्हान दिले. सुरुवातीला आ. पाटील यांना भेटल्यावर गोकुळबाबतचा त्यांचा गैरसमज दूर करू, असे मुश्रीफांनी स्पष्ट केले होते. आ. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत आपले वजन वापरून गोकुळवर प्रशासक आणून आपली दिशा स्पष्ट केली.