कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, ‘गोकुळ’ची अध्यक्ष निवड गुरुवारी (दि. २९) होत आहे. गोकुळ शिरगाव येथील प्रधान कार्यालयात सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात होईल. निवडीवरून राजकीय वातावरण तापले असल्याने बैठकस्थळी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
‘गोकुळ’ निवडणुकीत समविचारी आघाडीने १३ जागांवर विजय मिळवत बहुमत मिळवले. तर, महायुतीला १२ जागांवर समाधान मानावे लागले. यानंतर आज अध्यक्ष निवड होत आहे. मात्र, अध्यक्ष निवडीच्या बैठकीचा कोरम पूर्ण करण्यासाठी १४ संचालकांची उपस्थिती आवश्यक आहे. ही संचालक संख्या दोन्ही आघाड्यांकडे नसल्याने पेच निर्माण झाला आहे.
दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकार्यांकडून अध्यक्ष निवड बैठकीसाठीची तयारी पूर्ण झाली आहे. सर्व संचालकांना बैठकीसाठीची नोटीस देण्यात आली आहे. बुधवारी दुपारी सहायक निवडणूक अधिकारी युसूफ शेख, प्रेमदास राठोड यांनी बैठकस्थळाची पाहणी केली. कोरम संख्येवरून अध्यक्ष निवडीत ट्विस्ट निर्माण झाल्याने आजच्या बैठकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
महायुतीचे संचालक राहणार अनुपस्थित
गुरुवारी (दि. २९) होणार्या ‘गोकुळ’ अध्यक्ष निवड बैठकीसाठी महायुतीचे संचालक अनुपस्थित राहणार आहेत. गोव्यामध्ये महायुतीचे प्रमुख नेते, संचालक यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. त्यामुळे ही बैठक तहकूब होणार असल्याचे निश्चित आहे.