कोल्हापूर : समांतर सभेत अध्‍यक्ष निवड झाल्‍यानंतर ‘गोकुळ’मध्‍ये समविचारी आघाडीच्‍या समर्थकांनी गर्दी केली होती. 
कोल्हापूर

Gokul Chairman Election | कोरमअभावी ‘गोकुळ’ अध्‍यक्ष निवड सभा तहकूब

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : ‘गोकुळ’ अध्‍यक्ष निवडीसाठी गुरुवारी बोलावलेली सभा कोरमअभावी तहकूब झाली. समविचारीच्‍या १३ संचालकांनी सभेस उपस्‍थिती लावली. तर, महायुतीचे १२ संचालक अनुपस्‍थित राहिले. सभेसाठी १४ संचालक संख्‍येचा कोरम पूर्ण न झाल्‍याने निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी सभा तहकूब केली. निवडीदरम्‍यान आ. सतेज पाटील यांच्‍या समर्थकांनी ‘गोकुळ’च्‍या गोकुळ शिरगाव येथील प्रधान कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. येथे कडेकोट पोलिस बंदोबस्‍त तैनात केला होता.

समविचारी आघाडीचे १३ संचालक कार्यकर्त्यांसह गोकुळ शिरगाव कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता दाखल झाले. मात्र, १३ संचालकांना कार्यालयात, तर काही मोजक्‍या कार्यकर्त्यांना आवारात प्रवेश दिला. काही कार्यकर्त्यांनी प्रवेश करण्‍याचा प्रयत्‍न केला वेशद्वाराजवळच पोलिसांनी रोखले. यावेळी काही काळ गोंधळ निर्माण झाला. दरम्‍यान, माजी आमदार ऋतुराज पाटील दुपारी येथे दाखल झाले. त्‍यांनी समविचारीला बहुमत असल्‍याने अध्‍यक्ष निवडीसाठी महायुतीचे १२ संचालक उपस्‍थित राहतील, अशी अपेक्षा होती. गेल्‍या दोन महिन्‍यांतील संघाचा तोटा पाहता येथे संचालक मंडळ अस्‍तित्‍वात येणे आवश्यक आहे. मात्र, महायुती नेत्‍यांची वक्‍तव्‍ये पाहता त्‍यांच्‍याकडून दूध उत्‍पादक शेतकर्‍यांचे हित बाजूला ठेवत ‘गोकुळ’मध्‍ये सत्तेच राजकारण सुरू असल्‍याचा आरोप केला. तसेच, ‘गोकुळ’चे संस्‍थापक स्‍व. आनंदराव पाटील-चुयेकर यांचा फोटो महायुतीने प्रसिद्धी पत्रकावर वापरला; पण त्यांच्या वारसदारांची अध्‍यक्षपदी निवड करताना महायुतीने मागील वेळेसह आताही खोडा घातला, हे दुर्दैवी आहे, असेही ऋतुराज पाटील म्हणाले.

‘गोकुळ’ अध्‍यक्ष निवडही कायदेशीर कचाट्यात

कोल्‍हापूर : ‘गोकुळ’ची अध्‍यक्ष निवडही आता कायदेशीर कचाट्यात सापडण्‍याची दाट शक्‍यता आहे. ‘समविचारी’कडे बहुमत असूनही सभा तहकूब केल्‍याने आ. सतेज पाटील याबाबत न्‍यायालयात जाण्‍याची शक्‍यता आहे. गुरुवारी त्‍यांच्‍या अजिंक्‍यतारा कार्यालयामध्‍ये वकिलांची फौज तैनात होती. निवडीबाबतच्‍या कायदेशीर बाबी तपासून शुक्रवारी समविचारी आघाडी न्‍यायालयात याचिका दाखल करण्‍याची शक्‍यता आहे.

‘गोकुळ’च्‍या निवडणूक प्रक्रियेचा प्रत्‍येक टप्‍पा हा कायदेशीर कचाट्यातूनच पुढे गेला आहे. आता निवडणुकीचा अध्‍यक्ष निवडीचा अंतिम टप्‍पा होता. ‘समविचारी’ला बहुमत मिळाल्‍याने त्‍यांचा अध्‍यक्ष होणार, असे चित्र होते. मात्र, अध्‍यक्ष निवड बैठकीचा कोरमचा मुद्दा पुढे आला अन् अध्‍यक्ष निवडही वादाच्‍या भोवर्‍यात सापडली. संचालक बहुमताच्‍या संख्‍येवर अध्‍यक्ष निवड करण्‍याची मागणी केली. मात्र, निवडणुक निर्णय अधिकार्‍यांनी ती अमान्‍य केली. मात्र, अध्‍यक्ष निवडीसाठी केवळ बहुमताची संख्‍या आवश्‍यक असणे गरजेचे आहे, असे मत समविचारी आघाडीचे आहे. त्‍यांनी समांतर सभा घेत बहुमताच्‍या संख्‍येवर अध्‍यक्ष निवड केली. या सभेचे इतिवृत्त तयार करून घेतले आहे. बहुमताच्‍या आधारे अध्‍यक्ष निवड कायदेशीर ठरविण्‍याबाबत ‘समविचारी’ न्‍यायालयात जाण्‍याची शक्‍यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT