Gokul | गोकुळ ब्रँडला धक्का लागू देणार नाही : प्रशासक संजयकुमार सुद्रीक 
कोल्हापूर

Gokul | गोकुळ ब्रँडला धक्का लागू देणार नाही : प्रशासक संजयकुमार सुद्रीक

प्रशासक मंडळाने स्वीकारला पदभार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गोकुळ संचालक मंडळाची मुदत संपल्यामुळे प्रशासकांची नियुक्ती झाली आहे. यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही आहे. सध्या सुरु असलेल्या कार्यपद्धतीनुसारच गोकुळचे कामकाज चालेल. गोकुळ कोल्हापूरच्या सहकाराचा वारसा आहे. त्यामुळे या ब्रँडला धक्का लागू देणार नाही. सध्या ज्या स्थितीत दूध संघ आहे, त्याच स्थितीत हा दूध संघ नूतन संचालकांच्या हातामध्ये देणार असल्याचे नूतन प्रशासक संजयकुमार सुद्रीक यांनी सांगितले.

गोकुळवर सोमवारी दुपारी शासकीय प्रशासकांची नियुक्ती झाल्यानंतर नूतन पाच सदस्यीय प्रशासक मंडळाने तत्काळ सायंकाळी चार वाजता पदभार स्वीकारला. मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रीक, सदस्य प्रदीप मालगावे, सागल बलकवडे, चंद्रकांत परुळेकर यांनी गोकुळ शिरगाव येथील कार्यालयात उपस्थिती लावत पदभार स्वीकारला; तर सुनील धायगुडे रात्री काही वेळाने हजर झाले. यावेळी कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी नूतन प्रशासकीय मंडळाचे स्वागत केले.

याप्रसंगी बोलताना प्रशासक सुद्रीक म्हणाले, आम्ही फक्त संचालक मंडळाची जागा घेतली आहे. त्यांच्या ऐवजी आम्ही निर्णय घेणार इतकाच बदल आहे. संघाचे उपक्रम पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील. गोकुळ ही सभासदांची संस्था आहे. निवडणूक होईपर्यंत आम्ही त्याची जपणूक करू. काळजीवाहू म्हणूनच आम्ही कार्यरत राहू असे त्यांनी सांगितले. तसेच गोकुळच्या दैनंदिन कामकाजाची पाच सदस्यांमध्ये विभागणी करणार आहे. दर पंधरा दिवसांनी आढावा घेणार आहे. ग्राहक, उत्पादक, संस्था यांचे हित जपण्यालाच प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT