गोकुळची वार्षिक सभा ठरविणार जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा 
कोल्हापूर

Kolhapur news : गोकुळची वार्षिक सभा ठरविणार जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा

महायुतीतील नेत्यांतच उघड उघड संघर्ष

पुढारी वृत्तसेवा

चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर : वार्षिक चार हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या गोकुळ या जिल्ह्याच्या बलाढ्य आर्थिक गडावर कब्जा मिळविण्यासाठी आता महायुतीतील नेत्यांतच उघड संघर्ष उफाळला आहे. येत्या मंगळवारी गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा होत असून संचालक मंडळ निवडणुकीच्या पूर्वी होणारी ही शेवटची वार्षिक सभा आहे. त्यामुळे निवडणुकीत गोकुळवरील वर्चस्वासाठी टोकाच्या संघर्षाची तयारी सुरू आहे. महायुतीच्या नेत्यांतच हा संघर्ष सुरू असून, कोण कुणावर मात करणार यावर जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.

महाडिक गटाच्या ताब्यात असलेल्या गोकुळ गडावर सतेज पाटील, हसन मुश्रीफ, विनय कोरे व त्यांच्या सहकार्‍यांनी विजयाचा झेंडा फडकविला. मात्र राज्यातील सत्तांतराने गोकुळचे सत्तेचे गणित विसकटले. महाविकास आघाडीचे नेते हसन मुश्रीफ महायुतीचे नेते बनले. गोकुळ अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आदेश झुगारून लोकसभा व विधानसभेला शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार केला.

राज्यातील सत्तांतरानंतर गोकुळमध्येही सत्तांतर

त्यांची अध्यक्षपदाची मुदत संपत असतानाच त्यांनी महायुतीचा अध्यक्ष होणार असेल तरच आपण राजीनामा देऊ असे म्हणचे राज्यातील महायुतीच्या नेत्यांचा आधार घेतला त्यामुळे सहकारात पक्ष नाही म्हणणार्‍यांना झटका बसला. नावे निश्चित करूनही व निश्चित केलेले नाव बदलूनही गोकुळचे सत्ताधारी आपल्याला हवा तो अध्यक्ष करू शकले नाहीत. त्यामुळे ऐन वेळी हसन मुश्रीफ यांना नेत्यांच्या आदेशानुसार आपल्या मुलाला नाविद यांना अध्यक्ष करावे लागले.

वर्चस्वाचा संघर्ष

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीच्या ईर्ष्येने टोक गाठले आहे. त्यामुळे प्रत्येक गट या निवडणुकीत आपल्या गटाची ताकद कशी वाढेल यासाठी प्रयत्न करत आहे. यातूनच पुढच्या जागावाटपात आपला वाटा मोठा असेल यासाठी प्रत्येक नेत्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच संघर्षाचा वर्चस्वाचा भाग म्हणून गोकुळमध्ये ताकद दाखविली जात आहे. आता गोकुळमध्ये कोण आक्रमक असणार? कोण कोणावर मात करणार यातच पुढच्या वर्चस्वाची बीजे रोवली जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT