कोल्हापूर : वरून आदेश आला असे म्हणत शनिवारी (दि.2) गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयात दोन पोलिस कर्मचारी दाखल झाले. गोकुळच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना आतमध्ये प्रवेश न देता गेटवरच थांबवले. मध्यरात्री दीड वाजेपर्यंत पोलिस थांबले व निघून गेले. काही कागदपत्र नष्ट करण्याची चर्चा रंगल्याने पोलिस बंदोबस्त पाठविण्यात आल्याची चर्चा आहे. या प्रकारामुळे गोकुळची यंत्रणाही अलर्ट झाली. रविवारी दिवसभर थेट प्रवेश बंद केला. येणार्या व्यक्तींची चौकशी करूनच त्यांना प्रवेश दिला जात होता.
गोकुळवरील प्रशासक नियुक्तीवरून राजकारण तापले आहे. मंगळवारी प्रशासक नियुक्त होणार असल्याने अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहेत. प्रशासक नियुक्तीमुळे गोकुळमधील काही कागदपत्रे नष्ट केली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे एका यंत्रणेकडून गोकुळच्या गोकुळ शिरगाव, ताराबाई पार्क आणि मुंबईतील वाशी येथील कार्यालयावर पोलिस बंदोबस्त तैनात केल्याचे समजते. तसेच गोकुळ शिरगाव येथील प्रकल्पाबाहेर अग्निशमनचा बंब ही उभा असल्याचे सांगितले जात आहे.
कागदपत्र नष्ट करण्याची चर्चा, पोलिस बंदोबस्त यामुळे गोकुळची यंत्रणाही अलर्ट झाली. त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सर्वच कार्यालयांचे प्रवेशद्वार बंद करत थेट प्रवेश बंद केला. शनिवारी रात्रीही ताराबाई पार्क येथील सुरक्षा रक्षकांकडून पोलिस आल्याची माहिती मिळताच त्यांना आतमध्ये प्रवेश न देण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या. त्यामुळे पोलिस येथे सुमारे तीन तास प्रवेशद्वारावरच थांबून होते. या प्रकारामुळे रविवारी दिवसभर काहीसे तणावाचे वातावरण होते.