कोल्हापूर : सहायक निबंधक ठाकरे यांना निवेदन देताना दूध संस्था प्रतिनिधी.  
कोल्हापूर

Gokul | 481 संस्थांची सुनावणी प्रलंबित; प्रतिज्ञापत्रात 1050 का दाखवल्या?

सहायक निबंधकांना दूध संस्था प्रतिनिधींनी विचारला जाब

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : अवसायन प्रक्रियेतील 481 दूध संस्थांची सुनावणी प्रलंबित असताना न्यायालयात सादर केलेल्या प्रमाणपत्रात 1050 संस्थांची सुनावणी प्रलंबित असल्याचे का दाखवले? आपण पहिल्या दिवशी 170 दूध संस्थांची सुनावणी पूर्ण केली. मग, आता उर्वरित संस्थांच्या सुनावणीला 70 ते 80 दिवसांचा कालावधी का लागणार, असा जाब सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांना दूध संस्था प्रतिनिधींनी विचारला. यामुळे शुक्रवारीही (दि.24) येथील वातावरण तणावपूर्ण होते.

गोकुळशी संलग्न अवसायन प्रक्रियेतील दूध संस्था प्रतिनिधींनी शुक्रवारी (दि. 24) सहायक निबंधक कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी ‘दूध संस्थांना न्याय मिळालाच पाहिजे’, ‘सुनावणी पक्रिया तत्काळ सुरू करा’, ‘संस्था बंद पाडणार्‍या बेलवाडेचा धिक्कार असो’ अशी जोरदार घोषणाबाजी केली. ठाकरे यांना मागणीचे निवेदन दिले.

याप्रसंगी कुरुकलीचे विकास पाटील म्हणाले, दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया वारंवार थांबत असल्याने याला राजकीय वास येत आहे. कोण काय सांगत असलं, तरी यामध्ये चुकीच काही करू नका. या दूध संस्थांवर अनेकांचे संसार उभे आहेत. तुमचं राजकारण होईल; मात्र आमच्या संस्था, कर्मचारी बोंबलत जातील आशा शब्दांत संताप व्यक्त केला. तसेच सुनावणीची प्रक्रिया तत्काळ सुरू करा, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा दिला. यावर ठाकरे यांनी 4 मेपासून सुनावणीला सुरुवात करणार असल्याचे सांगितले. यावेळी युवराज पाटील, राजेखान जमादार, दत्तात्रय पाटील, राजू जाधव, शेखर देसाई, संजय कलिकते, निवास पाटील आदी उपस्थित होते.

..तर दूध उत्पादक गप्प बसणार नाहीत

गोकुळ ही दूध संस्था, उत्पादकांची संस्था आहे. सध्याच्या घडामोडी पाहता गोकुळ मोडीत काढण्याचे षड्यंत्र काहींकडून सुरू असल्याचे निदर्शनास येते. गोकुळ मोडीत काढण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर दूध उत्पादक, संस्था गप्प बसणार नाहीत, असा इशारा संस्था प्रतिनिधींनी दिला.

ज्यांनी आणलं, त्यांच्या घरात जाऊन बसा

सुनावणी 28 एप्रिलपासून सुरू करा, कोणाच्या सांगण्यावरून सुनावणी लांबणीवर टाकण्याचे काम करणार असाल, तर इथे कशाला बसताय ज्यांनी आणलं त्यांच्या घरातच बसा, असा संताप प्रतिनिधींनी व्यक्त केला.

दूध संस्थांच्या सुनावणीला चार मेपासून होणार सुरुवात

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाशी संलग्न त्या दूध संस्थांच्या अवसायन प्रक्रियेसंबंधी सहायक निबंधक कार्यालयात सुरू असलेल्या सुनावणी प्रक्रियेला 4 मेपासून पुन्हा सुरुवात होणार आहे. गोकुळ निवडणुकीसंदर्भात कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुरू असलेली सुनावणी आणि शासकीय कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे सुनावणी प्रक्रिया थांबली असल्याचे सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी सांगितले.

गोकुळशी संलग्न 1320 दूध संस्थांपैकी अद्याप 212 दूध संस्थांना सुनावणीबाबत नोटीसच बजावलेली नाही. यामध्ये सर्व तालुक्यांतील दूध संस्थांचा समावेश आहे. 90 संस्था या गोकुळशी संलग्न नाहीत. तत्कालीन निबंधक सुजय कदम यांनी 455 दूध संस्थांची सुनावणी पूर्ण करून 267 संस्थांना निकाल कळवले आहेत.

ठाकरे यांनी मंगळवारी एका दिवसात 170 दूध संस्थांची सुनावणी पूर्ण केली होती. आता 635 दूध संस्थांची सुनावणी होणे बाकी आहे. या संस्थांची सुनावणी 4 मेपासून सुरू होणार आहे. शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड तालुक्यातील सर्वच संस्थांची सुनावणी होणे बाकी आहे. त्यांना नोटीस पाठविण्याचे काम काम सुरू आहे.

निकाल न दिलेल्या संस्थांचीही सुनावणी?

तत्कालीन निबंधक कदम यांनी ज्या संस्थांची सुनावणी घेतली आहे, त्यांना निकाल कळविलेला नाही, अशा संस्थांची सुनावणी पुन्हा घ्यायची का? त्यांना निकाल कळवायचा का, याबाबत कायदेशीर बाबी तपासून पुढील कार्यवाही करणार असल्याचे निबंधक ठाकरे यांनी सांगितले. सुनावणी न झालेल्या दूध संस्थांची तालुकानिहाय संख्या अशी : राधानगरी 157, भुदरगड 197, शाहूवाडी 133, करवीर 34, कागल 42, पन्हाळा 30, हातकणंगले 13, शिरोळ 8, गडहिंग्लज 5, चंदगड 7, गगनबावडा 4, आजरा 5.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT