कोल्हापूर : गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणार्या आंतरराज्य टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी पहाटे छडा लावला. याप्रकरणी दोघांना बेड्या ठोकून 1 कोटी 47 लाख 84 हजार रुपये किमतीचा साठा हस्तगत केला. पडवळवाडी (ता. करवीर) येथे सहाचाकी ट्रकवर छापा टाकून कारवाई करण्यात आली.
शैलेश जयवंत जाधव (वय 36, रा. कचरे गल्ली, उरुण ईश्वरपूर, ता. वाळवा) व वासुदेव केशवनाथ मुंढे (42, विठ्ठलवाडी, ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चौकशीत गोव्यातील तीन, तर नंदूरबार जिल्ह्यातील दोन तस्करांची नावेही निष्पन्न झाली आहेत. संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असे विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक किरण पवार यांनी सांगितले.
संशयित शैलेश जाधवसह वासुदेव मुंढे गोव्यातून कोल्हापूर व्हाया मराठवाडा, विदर्भासह अन्य राज्यांत बनावट दारूची तस्करी करीत असल्याचा सुगावा लागला होता. संशयिताचे आंतरराज्य टोळ्यांशी कनेक्शन असल्याची चर्चा होती. उत्पादन शुल्क विभाग आयुक्त राजेश देशमुख यांच्या निर्देशानुसार शाहूवाडी तालुक्यातील आंबा घाट कोल्हापूर मार्गावर तस्करांच्या हालचालींवर करडी नजर ठेवण्यात आली होती.
निरीक्षक किरण पवार यांच्यासह पथकाने पडवळवाडी येथे सहाचाकी ट्रकवर छापा टाकून तपासणी केली. ट्रकमध्ये 1 कोटी 47 लाख 84 हजार रुपये किमतीचे दारूचे 1 हजार 400 बॉक्स आढळले. तस्करांना अटक केली असून सखोल चौकशी करण्यात येत असल्याचेही पवार यांनी सांगितले.