कागल : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच लाख मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर प्रतिबंधक लस हे कवच कुंडल असून कोणतीही शंका न घेता मुलींनी ही लस घ्यावी असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. महिला दिनानिमित्त डी आर माने महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ह्युमन पॅपिलोमा व्हायरस प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ प्रसंगी मुश्रीफ बोलत होते. यावेळी संपूर्ण जिल्ह्यात घेण्यात येणाऱ्या लसीकरणाचा शुभारंभ कागल येथून करण्यात आला. (HPV vaccine)
यावेळी बोलताना मुश्रीफ पुढे म्हणाले, जगामध्ये महिलांची 50% शक्ती आहे हे ज्यांनी ओळखले ते देश श्रीमंत झाले. ज्यांनी ओळखले नाही ते देश गरीबच राहिले. आता महिलांना निर्णय प्रक्रियेमध्ये घेतले जाते. महिला सर्व क्षेत्रात पुढे येत आहेत. अशा महिलांना आमचा सलाम आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच लाख मुलींना लस देण्याचे शिवधनुष्य आपण उचलले आहे. शाळाबाह्य मुलींना देखील लस दिली जाणार आहे. महिलांनी न लाजता आपले दुखणे सांगावे त्यामुळे आजार पुढे जाऊ शकत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने या लसीमुळे कोणतेही साईड इफेक्ट होणार नाहीत असे स्पष्ट केले आहे. कॅन्सर रोग टाळण्याकरता ही लस मुलींना कवच कुंडले आम्ही देत आहोत. सिरम लसीचे आदर पूनावाला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यामुळे सवलतीच्या दरामध्ये ही लस उपलब्ध करून दिली आहे. दानशूर व्यक्ती आणि कंपन्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा. येत्या रामनवमीपर्यंत कागल तालुक्यातील लसीकरण संपून त्या दिवशी जिल्ह्याच्या लसीकरणाला शुभारंभ करून संपूर्ण जिल्हा कॅन्सर मुक्त करण्याचा आपला मानस असल्याची बोलून दाखवले.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अमोल एडके म्हणाले, महिला म्हणजे कुटुंब आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाने लस घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. मोफत लसीकरणाचा फायदा घ्यावा. आतापर्यंत झालेल्या कल्याणकारी योजना कागल मधूनच सुरुवात झालेली आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लसीकरणाचे उच्चांकी काम होईल. जिल्ह्यातील सर्व शाळेमध्ये शंभर टक्के लसीकरण करून महिलांचा सन्मान करावा असे ते म्हणाले.
यावेळी राज्याचे वैद्यकीय वैद्यकीय शिक्षण संचालक चंदन वाले म्हणाले, शरीरामध्ये लस गेल्यानंतर कोणताही वाईट परिणाम दिसून येत नाही. प्रजनन क्षमतेवर कमतरता येत नाही. लसीकरण बिनधास्त करून घेणे गरजेचे आहे. मुश्रीफ यांनी केलेले काम अतुलनीय आहे. लस घेतलेल्या कोणत्याही भगिनीला कॅन्सरची लागण होत नाही असे ते म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी एस कार्तिकीएन, जिल्हा शल्य चिकित्सक एस एस मोरे, यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर संस्थापिका डॉक्टर राधिका जोशी, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देसाई, तालुका वैद्यकीय अधिकारी फारूक देसाई, इब्राहिम अन्सारी सौ. अम्रीन मुश्रीफ, सौ शितल फराकटे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, राष्ट्रवादी कागल शहर अध्यक्ष सौ पद्मजा भालबर, माजी उपनगराध्यक्ष सौ वर्षा बणे यांची मनोगती झाली.