कोल्हापूर : मुलीला जन्म देण्याचा न्यूनगंड टाळून, समाजाच्या नाराजीची पर्वा न करता एक किंवा दोन कन्यारत्नांना जन्म देऊन तिला घडविणाऱ्या पालकांचे समाजातील मानसिकता बदलाच्या नांदीत मोठे योगदान आहे. मुलगाच हवा या मानसिकतेच्या गर्तेत एक किंवा दोन मुलींवरच कुटुंब पूर्ण करणाऱ्या पालकांचा निर्णय समाजात सकारात्मक विचाराची पेरणी करत आहे, असे प्रतिपादन महापौर रूपाराणी निकम यांनी केले. तर, देशाच्या ‘जीडीपी’मध्ये महिलांचे योगदान १७ टक्के आहे. त्यामुळे उच्चशिक्षित मुलींच्या आर्थिक सहभागाची दरी अजूनही आहे. महिलांच्या कौशल्याचा आणि बुद्धिमत्तेचा उपयोग देशाच्या विकासासाठी झाला पाहिजे. अर्थव्यवस्थेतील मुलींचा सहभाग वाढण्यासाठी इको-सिस्टीमची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी केले.
स्त्रीभ्रूण हत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुलीच्या जन्माचा स्वीकार करण्याच्या निर्णयाला बळ देण्यासाठी ‘पुढारी’च्या वतीने आयोजित ‘मुलगी हवी हो’ या उपक्रमांतर्गत कन्यारत्न असलेल्या पालकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. गुरुवारी (दि. २७) सकाळी गायन समाज देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून महापौर निकम व डॉ. जाधव यांनी संवाद साधला.
या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक मे. गोपीनाथ अनंत चिपडे सराफ, भाऊसिंगजी रोड आणि व्हीनस कॉर्नर, सहप्रायोजक सारस्वत को-ऑप. बँक लि., भंडारी ग्रुप होते तर व्ही. जे. पाटील फाऊंडेशन, जिल्हा परिषद कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी गोपीनाथ अनंत चिपडे सराफ यांच्या वतीने संजीवनी चिपडे, मुरलीधर चिपडे, बन्सीधर चिपडे, सारस्वत बॅंकेच्या वतीने कोल्हापूर विभाग होलसेल बॅंकिंगप्रमुख सी.ए. धनश्री काळे, भंडारी ग्रुपच्या मंगल भंडारी व व्ही. जे. पाटील ग्रुपच्या आरती यादव, कंदलगावचे सरपंच राहुल पाटील उपस्थित होते. तसेच दै. ‘पुढारी’चे सहायक समूह सरव्यवस्थापक अमित डिक्कर, निवासी संपादक देविदास लांजेवार, विभागीय व्यवस्थापक ऑपरेशन्स अँड मार्केटिंग हरीश हिंगणे, विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार, काॅर्पोरेट जाहिरात वरिष्ठ व्यवस्थापक रूपा जोशी, विभागीय व्यवस्थापक स्पेशल इनिशिएटिव्ह बाळासाहेब नागरगोजे, वरिष्ठ इव्हेंट व्यवस्थापक राहुल शिंगणापूरकर, सहायक व्यवस्थापक रिया भांदिगरे, दै. ‘पुढारी’चे मुख्य प्रतिनिधी अनिल देशमुख यांच्यासह संपादकीय विभाग, शहर प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी उपस्थित होते. टोमॅटो एफएमचे आर.जे. विश्वराज जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट मोडून पालकांची नवी वाट : महापौर निकम
महापौर निकम म्हणाल्या, मुलगा व मुलगी यांच्यात भेद न करता तिला जन्म देऊन घडवले, अशा पालकांना मानाचा मुजरा केला पाहिजे. सामाजिक व कौटुंबिक दबावाची चौकट मोडून त्या पालकांनी कन्यारत्न स्वीकारले. पालकांनी ही धिटाई दाखवली म्हणूनच मुली ऑलिम्पिकपासून अंतराळापर्यंत विविध क्षेत्रांत कर्तृत्व सिद्ध करत आहेत. हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम नसून सामाजिक परिवर्तनाची दिशा दाखवणारी चळवळ आहे.
सन्मान निर्णयक्षमता, विचारांचा : डॉ. जाधव
स्वत:चे निर्णय घेण्याची मुभा व त्या निर्णयाप्रति समाजाकडून मिळणारा आदर हा खरा मुलींचा सन्मान आहे. ग्रामीण मुलींचे विचार व निर्णयक्षमता प्रगल्भ होत आहे. उच्च शिक्षणात आज ५० टक्क्यांहून अधिक मुली आघाडीवर आहेत. मुलींना कुटुंब आणि करिअरचा समतोल साधता यावा, यासाठी सक्षम इको-सिस्टीम निर्माण करणे आवश्यक आहे. मुलींना परावलंबी न करता कणखर बनवा. त्यांच्या निर्णयक्षमतेचा आदर करा आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी द्या, असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले.
नाराजीपासून... सन्मानापर्यंत...
सत्कारावेळी उपस्थित पालक काही क्षणांसाठी एका वेगळ्याच भावविश्वात हरवून गेले. मुलगी जन्माला आली तेव्हा कुटुंबातील काही नातेवाईकांच्या चेहऱ्यावर उमटलेली नाराजी, ‘मुलगा झाला असता तर...’ अशी व्यक्त झालेली हळहळ आणि त्या क्षणी मनात उमटलेली असंख्य प्रश्नचिन्हे… हा भूतकाळ अनेकांच्या डोळ्यांसमोर तरळला. मात्र, त्याच मुलीला प्रेमाने वाढवले, शिक्षण दिले, तिच्या स्वप्नांना पंख दिले आणि आज तिचे आई-वडील म्हणून दैनिक ‘पुढारी’च्या व्यासपीठावर सन्मानित होण्याचा क्षण त्यांनी अनुभवला. त्यामुळे त्या जुन्या नाराजीच्या आठवणी आज अभिमानात बदलल्या होत्या. सत्काराचे सन्मानचिन्ह स्वीकारताना काही पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. आमची मुलगीच आमचा अभिमान आहे, ही भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. आजचा हा सन्मान केवळ पालकांचा नव्हे, तर मुलीच्या अस्तित्वावर ठेवलेल्या विश्वासाचा विजय ठरला, अशी प्रतिक्रिया त्यांच्या ओठावर आली.
स्त्रीशक्तीला दै. ‘पुढारी’चे प्रोत्साहन
‘पुढारी’ वृत्तपत्र समूहाने केवळ लिखाणातून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून स्त्रीभ्रूण हत्येविरोधात जनजागृती केली असून मुलींच्या सन्मानासाठी सातत्याने भूमिका घेतल्याबद्दल महापौर निकम यांनी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यासह ‘पुढारी’ परिवाराचे अभिनंदन केले.