पूनम देशमुख
कोल्हापूर : हातात आयफोन, अंगावर ब्रँडेड कपडे, फिरायला वेगवान गाडी आणि स्वतःच्या आवडीप्रमाणे जगण्याची इच्छा.... हीच आजच्या जेन-झी पिढीची ओळख बनली आहे; मात्र या महागड्या जीवनशैलीचा संपूर्ण खर्च पालकांवर टाकण्याऐवजी शिक्षण घेतानाच स्वतः कमाई करण्याचा मार्ग या पिढीने स्वीकारला आहे. मिळेल ते, जसे मिळेल तसे काम करून उत्पन्न मिळविणाऱ्या या नव्या कार्यसंस्कृतीला ‘गिग इकॉनॉमी’ म्हटले जाते. देश-राज्यात वेगाने विस्तारलेले हे कल्चर आता कोल्हापुरातही रुजू लागले असून, तरुणाईच्या रोजगार व जीवनशैलीत नवे बदल घडवू लागले आहेत.
पारंपरिक नोकरीच्या चौकटीतून बाहेर पडत लवचिक, कौशल्याधारित रोजगाराकडे कोल्हापुरातील तरुणाईचा कल वाढला आहे. ‘गिग इकॉनॉमी’च्या माध्यमातून फ्रीलान्सिंग, ऑनलाईन प्रोजेक्टस् आणि डिजिटल सेवांमध्ये काम करून अनेक तरुणी शिक्षणासोबतच आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारत आहेत. त्यामुळे ‘डिग्रीपेक्षा डिजिटल स्किल्स’ या संकल्पनेला नव्या पिढीत अधिक महत्त्व प्राप्त होत असल्याचे चित्र आहे. इंटरनेट, डिजिटल पेमेंट व्यवस्था आणि जागतिक ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे घरबसल्या देश-विदेशातील ग्राहकांसाठी काम करण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. कौशल्य, वेळेचे नियोजन व कामाच्या गुणवत्तेवर ही रोजगार व्यवस्था पारंपरिक नोकरीला पर्याय ठरत आहे. कायमस्वरूपी नोकरीपेक्षा असे प्रोजेक्टनिहाय काम करून नोकरीइतकेच मानधन मोबाईल व लॅपटॉपच्या माध्यमातून अनेकजजण घरबसल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी काम करून मिळवत आहेत.
करिअर मार्गदर्शकांच्या मते, डिजिटल युगात गिग इकॉनॉमी ही केवळ तात्पुरती फॅशन नसून भविष्यातील रोजगार व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग बनत आहे. विशेषतः लहान शहरांमध्ये इंटरनेट सुविधा, ऑनलाईन प्रशिक्षण आणि डिजिटल पेमेंट प्रणालीमुळे नव्या संधी निर्माण होत आहेत. कौशल्य असेल, तर स्थानिक बाजारपेठेपुरते मर्यादित न राहता जागतिक स्तरावरही काम करण्याची संधी उपलब्ध होत आहे.
गिग इकॉनॉमी म्हणजे...
गिग इकॉनॉमी म्हणजे अशी कामाची पद्धत जिथे तुम्हाला कायमची नोकरी नसते; पण छोट्या-छोट्या कामांसाठी किंवा प्रोजेक्टसाठी पैसे मिळतात. म्हणजेच, काम मिळेल तेव्हा काम करा आणि त्या बदल्यात पैसे मिळवा, अशी लवचिक कामाची पद्धत म्हणजे गिग इकॉनॉमी.
भारतात वेगाने वाढणारे क्षेत्र
देशातील विविध उद्योग अहवालांनुसार भारतातील गिग आणि प्लॅटफॉर्म इकॉनॉमीमध्ये सध्या सुमारे ७० ते ८० लाख कामगार कार्यरत आहेत. आगामी काही वर्षांत ही संख्या दोन कोटींपेक्षा अधिक होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. माहिती तंत्रज्ञान, ई-कॉमर्स, डिजिटल सेवा, शिक्षण, मीडिया आणि क्रिएटिव्ह क्षेत्रात गिग रोजगाराच्या संधी वेगाने वाढत आहेत.
गिग इकॉनॉमीतील करिअर क्षेत्रे
इंटेरियर व ग्राफिक डिझाईन
सोशल मीडिया व्यवस्थापन
व ऑनलाईन अध्यापन
व्हिडीओ एडिटिंग व कंटेंट रायटिंग
डिजिटल मार्केटिंग व वेब डिझाईन
व्हर्च्युअल असिस्टंट तसेच ट्रान्सलेशन
ई-कॉमर्स सपोर्ट, पॉडकास्ट एडिटिंग, यू ट्यूब कंटेंट
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित डेटा ॲनोटेशन