कोल्हापूर : गर्भलिंग निदान, गर्भपात करण्यासाठी सोनोग्राफी मशिनसह औषधांचा साठा कोठून उपलब्ध करण्यात आला, याबाबत करवीर पोलिसांकडून संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. मात्र, संशयित तपास पथकाला ताकास तूर लागू देत नसल्याचे चित्र आहे. करवीरचे पोलिस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार, पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सायंकाळी तीन तास संशयितांना फैलावर घेतले. त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.
आजरा येथील एका मृत व्यक्तीचेच नाव घेत तपासाची दिशा बदलण्याचा संशयितांचा खटाटोप सुरू आहे. मात्र, काही एजंटांची नावे चौकशीतून पुढे येत आहेत. गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या सेंटरवर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने छापा टाकून महेश सुबराव पाटील, श्रीमंत तानाजी पाटील, सुनील प्रकाश पाटीलसह अनिल टिपुगडे यांना बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने संशयितांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
केवळ पैसे कमाविण्याच्या उद्देशातून टोळीने गर्भलिंग निदान व गर्भपात सेंटर सुरू केल्याचे चौकशीत निष्पन्न होत असले, तरी या रॅकेटमध्ये आणखी काही साथीदारांचा समावेश असावा, असा संशय आहे. राधानगरी, भुदरगड तालुक्यांत एजंटांची साखळी कार्यरत असावी, असा कयास आहे. एक-दोन दिवसांत रॅकेटचा पर्दाफाश शक्य असल्याचे पोलिस निरीक्षक कळमकर यांनी सांगितले.
कारखाना व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार
साखर कारखान्याच्या क्वार्टर्समध्ये गर्भलिंग निदान व गर्भपात सेंटर कसे सुरू झाले. याचाही पोलिसांनी शोध सुरू केला आहे. कारखाना व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार सुरू असल्याचेही सांगण्यात आले.