कोल्हापूर : जिलेटिनच्या भीषण स्फोटाने सुर्वेनगर मंगळवारी सायंकाळी हादरले. कानठळ्या बसविणार्या आवाजाने दीड किलोमीटरपर्यंतच्या नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी शेजारील बंगल्यांचे झालेले नुकसान पाहून स्फोटाची तीव्रता लक्षात येत होती. नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. दुपारी बंगल्यामधून ड्रिलिंगचा आवाज येत असल्याचे शेजार्यांनी सांगितले. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बंगल्यामधून ३५ ते ४० वयोगटातील तीन तरुण बाहेर पडल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
बापूरामनगरपर्यंत आवाज
नागरिकांनी सुमारे दहा स्फोट झाल्याचे सांगितले. दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या बापूरामनगरमध्ये स्फोटाचा आवाज ऐकायला गेला. तीनशे मीटर अंतरापर्यंत खरमाती उडल्याचे नागरिकांनी सांगितले.
शेजारील वृद्धेचा उडाला थरकाप
शेजारील बंगल्यातील पाटील कुटुंबीय बाहेर गेले होते. पाठीमागील बाजूस असणार्या कुंभार यांच्या घरात वृद्धा होती. तिसर्या स्फोटात त्यांच्या घराच्या काचा फुटल्या. आवाजाने वृद्धेेचा थरकाप उडाला.
जिलेटिन आणले कुठून?
घटनास्थळी जिलेटिनच्या जळालेल्या कांड्या, वायर आणि वातीचा तुकडा मिळून आला. त्यामुळे स्फोटात जिलेटिनचा वापर झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. स्फोटक कायद्यान्वये जिलेटिन वापरावर बंदी आहे. पूर्वपरवानगीशिवाय जिलेटिन हाताळता येत नाही. संशयितांनी जिलेटिन आणले कठून? याचा शोध पोलिस घेत आहेत.
शेजारील घरांच्या काचा फुटल्या
स्फोटामध्ये बंगल्याच्या दोन रूमच्या तीन भिंती पडल्या. शेजारील जी. डी. पाटील, आर. डी. कुंभार आणि जिरगे यांच्या बंगल्याच्या खिडकीच्या काचा स्फोटात फुटल्या. तसेच कुंभार यांच्या सोलरचेही नुकसान झाले.
दोघे ताब्यात; चौकशी सुरू
पोलिसांनी घटनास्थळी बॉम्बशोधक पथकाला पाचारण केले. रात्री उशिरा दोघा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. बोळींजकर यांना तीन मुले व एक मुलगी आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा मनीष यांनी मिळकतीवर वारसांची नावे लावून घेताना बंगला प्रज्योत पवार याच्या नावावर असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर गेले दीड वर्ष त्यांच्यामध्ये न्यायालयात वाद सुरू आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक नीलोत्पल, करवीर पोलिस उपअधीक्षक आप्पासाहेब पोवार, पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी करे, रणजित पाटील, विजय तळसकर, अविनाश पोवार यांच्यासह फॉरेन्सिकचे पथक घटनास्थळी दाखल झाले.