विशाळगड : गजापूर (ता. शाहूवाडी) येथे विशाळगड पर्यटक कर गोळा करणार्या कर्मचार्याला एका व्यक्तीने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत कर्मचार्याच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना जखमा झाल्या आहेत. याप्रकरणी शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र प्रकाश हेगिष्टे (वय 34, रा. गजापूर, वाणी पेठ) हे गेल्या सात वर्षांपासून ग्रुप ग्रामपंचायत गजापूर विशाळगड येथे कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, कर्नाटक पासिंग मोटारीतून गावातीलच गोपाळ मालुसरे हा पर्यटकांना घेऊन जात होता. यावेळी हिगिष्टे यांनी कर मागणी केली. यावेळी हे आपले पाहुणे असल्याचे सांगत मालुसरे याने वाद घातला.
त्यानंतर दुपारी मालुसरे पुन्हा दिसल्यावर हेगिष्टे यांनी त्याला साहेब म्हणून हाक मारली. यावर ‘तू मला का हाक मारलीस?’ असे विचारत हेगिष्टे यांना कट्ट्यावरून खाली ढकलून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत हेगिष्टे यांच्या डोक्याला दुखापत झाली असून, रक्तस्राव झाला आहे. तसेच, त्यांच्या हात आणि पायांनाही मार लागला आहे.