कोल्हापूर : ‘मोका’अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यापासून पसार झालेल्या गवळी गँगचा म्होरक्या त्र्यंबक वसंत गवळी (३९, रा. राजेंद्रनगर) व त्याचा साथीदार अमित हणमंत गवळी (१९, रा. राजेंद्रनगर) यांना राजारामपुरी पोलिसांनी जेरबंद केले. पुणे येथील आंबेगाव परिसरातील एका झोपडपट्टी परिसरात वेश बदलून हे दोघे राहात होते. पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.
कुमार गायकवाड खून प्रकरणातील संशयित रवी कांबळे याच्यावर १५ ऑगस्टला प्राणघातक हल्ला झाला होता. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी त्र्यंबक गवळी, श्रीमंत गवळी, अमित गवळी, सुमित गवळी, सलीम अफखान, अविनाश ऊर्फ सोन्या जगधने, शुभम ऊर्फ अक्षय मोळे, कार्तिक भालकर, सचिन कांबळे ऊर्फ टिंग्या यांना अटक केली होती. गवळी गँगने आर्थिक फायद्यासाठी सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवली होती. या टोळीने राजेंद्रनगर, दौलतनगर परिसरात उच्छाद मांडला होता. राजारामपुरी पोलिसांनी दाखल केलेल्या ‘मोका’अंतर्गत प्रस्तावास पोलिस अधिक्षक निलोत्पल यांनी मंजुरी दिली. यानंतर सात संशयितांना अटक केली; तर त्र्यंबक व अमित पसार झाले होते. त्यांना सोमवारी सकाळी पुणे येथून अटक केली. मंगळवारी सकाळी न्यायालयात हजर केले असता, शनिवार, दि. ७ नोव्हेबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
पोलिस उपअधीक्षक प्रवीण गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक रुपेश इंगळे, पोलिस अंमलदार विशाल शिरगांवकर, मिलिंद बांगर, शाहू तळेकर, गजानन हराळे यांनी ही कारवाई केली.