कोल्हापूर

‘गावडे विद्यापीठा’त होता असाही प्रामाणिकपणा!

दिनेश चोरगे

कोल्हापूर; विशेष प्रतिनिधी :  बनावट गुणपत्रिकांच्या क्षेत्रात गावडे गुरुजींनी जवळपास चार-पाच दशके धुमाकूळ घातला. मात्र, या 'गावडे विद्यापीठा'चीही एक खासियत होती, एक सचोटी होती, एक प्रमाणिकपणा होता, असे सांगितले तर कुणाला खरे वाटणार नाही; पण ती वस्तुस्थिती होती. तुम्ही दहावीत नापास झाला असाल तरच तुम्हाला पास झाल्याचे गुणपत्रक मिळणार, बारावीत नापास झाला असाल तरच बारावी पासचे प्रमाणपत्र मिळणार, तुम्ही जी पदवी परीक्षा नापास झाला असाल त्याच पदवीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र मिळणार, अशी गावडे विद्यापीठाची खासियत होती. तुम्ही अजिबातच शाळा शिकलेला नाही किंवा अगदी दुसरी-चौथीपर्यंत शाळा शिकलाय आणि द्या त्याला दहावीचे प्रमाणपत्र, असे इथे कधीही होत नव्हते. तुम्ही ज्या वर्गात नापास झाला, जिथे तुमची गाडी बंद पडली त्याच वर्गाचे प्रमाणपत्र इथून मिळत होते.

त्याचप्रमाणे ज्या वर्गातील आणि ज्या शाखेतील विद्यार्थी त्याच वर्गाचे उत्तीर्ण प्रमाणपत्र, असाही इथे खाक्या होता. उगाचच मी बी.ए. झालोय आणि मला बी.कॉम. अथवा बी.एस्सी.चे प्रमाणपत्र द्या, असे इथे चालत नव्हते. असेही सांगितले जातेय किंवा शिगाव परिसरात अशी चर्चा ऐकायला मिळते की, एम.बी.बी.एस. किंवा तत्सम वैद्यकीय परीक्षेत नापास झालेल्या काही जणांनी गावडे विद्यापीठातून प्रमाणपत्रे घेऊन त्याआधारे परदेशात यशस्वी उच्च शिक्षण घेऊन तिथेच आपले दवाखाने थाटले आहेत. असेही काही दाखले मिळतात की, गावडे विद्यापीठाची पदवी घेऊन शासकीय नोकरी करून आता काही मंडळी सेवानिवृत्तही झाली आहेत.

शासकीय नोकरीत रूजू झाल्यानंतर संबंधितांच्या झाडून सगळ्या कागदपत्रांची पडताळणी किंवा फेरपडताळणी हे प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू झाले आहेत. पूर्वी अशी पडताळणी होत नसावी किंवा होत असली, तरी ती आजच्या इतकी कसोशीने होत नसावी. त्यामुळेच जवळपास पन्नासभर वर्षे सुखेनैव पद्धतीने गावडे विद्यापीठाचा कारभार सुरू होता; पण जसजशी कागदपत्रांची पडताळणी कडक होत गेली, तसतशा गावडे विद्यापीठाच्या कारभाराला मर्यादा पडत गेल्या आणि अलीकडील काळात तर या कारवाया जवळपास बंद आहेत.

गावडे विद्यापीठाचे नेमके किती लाभार्थी आहेत आणि ते कुठल्या कुठल्या क्षेत्रात आहेत, याची कसलीही माहिती दस्तूरखुद्द गावडे गुरुजींनाच नाही. कारण, चाळीस-पन्नास वर्षांत गुरुजींनी केलेल्या कारनाम्यांची त्यांनी किंवा अन्य कुणी, कुठे नोंद ठेवलेली नाही; पण या भागातील लोकांच्या चर्चेतून अनेक बडे बडे नोकरशहा, काही लोकप्रतिनिधी, काही शिक्षक-प्राध्यापक, वकील एवढेच काय; पण पोलिस खात्यातही गावडे विद्यापीठाचे लाभार्थी असल्याची चर्चा कानावर पडत असतात. वयोमानानुसार जवळपास दहा-पंधरा वर्षांपासून गावडे गुरुजींनी आपल्या विद्यापीठाला टाळे ठोकलेले दिसत आहे. कारण, अलीकडे या विद्यापीठातील कोणत्याही घडामोडी कानावर येत नाहीत. मात्र, या विद्यापीठातून धडे गिरवलेल्या गावडे गुरुजींच्या चेल्यांनी आता राज्यभर धुमाकूळ घालायला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. शिवाय, आजकाल या मंडळींचे कार्यक्षेत्र पार विश्वव्यापी झाल्याचे दिसत आहे. असे म्हणतात की, आजकाल या मंडळींकडे जगातील कोणत्याही विद्यापीठाची, कोणत्याही शाखेची बनावट पदवी अगदी विनासायास उपलब्ध होते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या पावलावर पावले टाकून या मंडळींनी आपलेही बनवेगिरीचे तंत्रज्ञान एवढे अद्ययावत केले आहे की, विचारायची सोय नाही. कोणत्याही विद्यापीठाला आपल्याच विद्यापीठाचे बनावट गुणपत्रक सहजासहजी ओळखू शकणार नाही, एवढी त्यात अचूकता आणलेली आहे. त्यामुळे या टोळीची पाळेमुळे खणून काढणे आव्हानात्मक ठरणार आहे.

गावडे गुरुजींचे अजब तत्त्वज्ञान!

आपल्या या गोरखधंद्याचे समर्थन गावडे गुरुजी अगदी चलाखीने करतात. रस्त्यात एखादी गाडी बंद पडली तर लोक धक्का मारून ती गाडी चालू करतात. मीसुद्धा नेमके तेच केलेले आहे. नापास होऊन बंद पडलेल्या लोकांना मी धक्का देऊन आयुष्याच्या पुढच्या वाटेवर ढकलले आहे, असे त्यांचे मत आहे. मी ज्यांना ज्यांना अशा पद्धतीने धक्का देऊन पुढे ढकलले आहे, ती मंडळी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात चांगलेच काम करीत आहेत, असाही दावा गावडे गुरुजी खासगीत बोलताना करतात; पण आपल्या या कारनाम्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणार्‍या किती विद्यार्थ्यांच्या अप्रत्यक्ष नुकसानीला आपण हातभार लावला आहे, सामाजिक व्यवस्थेमध्ये किती अक्षम्य ढवळाढवळ केली आहे, ही बाब गावडे महोदय सोयीस्करपणे विसरून गेलेत, असे दिसते.

SCROLL FOR NEXT