कोल्हापूर : लाडक्या गणरायाचे उत्साहात वाजतगाजत स्वागत झाल्यानंतर अवघे वातावरण बाप्पामय झाले आहे. या उत्साहाला अजून मांगल्याची जोड देणार्या माहेरवाशीण गौराईचे रविवारी पारंपरिक प्रथेनुसार आगमन होणार आहे. गंगा-गौरीच्या स्वागतासाठी महिलावर्गाची तयारी पूर्ण झाली असून, शहरातील नदी, तलाव, पाणवठे येथून पारंपरिक वाद्यांच्या गजरात, झिम्मा-फुगडीचे फेर धरत गौराईची पावले घराघरांत उमटणार आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून महिला गौरीच्या पूजा, नैवेद्यासाठी लागणार्या साहित्याची खरेदी करत होत्या. गौरीचे मुखवटे, दागिने, आरास सजावट साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. रविवारी नऊवारी साडी, नथ, पारंपरिक दागिने परिधान करून महिला, युवतींच्या हस्ते गौरी आवाहन केले जाणार आहे.
आगमनाच्या पहिल्या दिवशी गौरीची शिदोरी म्हणून पाटवडी, भाकरी, आल्यापाल्याची भाजी असा नैवेद्य केला जाणार आहे. त्यासाठी शनिवारी दिवसभर बाजारात शेपू, भोपळीसह आल्यापाल्याची भाजी, पाटवडीसाठी बेसन, केळीची पाने, गजरा, फुले, केळी यांना मागणी होती.
गौरी आवाहनासाठी सकाळी 6 पासून सायंकाळी 5.27 मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे. पंचगंगा नदी, तलाव व पाणवठे येथे कलशपूजन व तेरड्याचे पूजन करून वाजतगाजत गौरी आणण्याची तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली आहे. तसेच, पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.