गुडाळ : मंगळवारी (दि.3) रात्री साडेआठच्या सुमारास खिंडी-व्हरवडे–आकनुर मार्गावरील खिंडीचा माळ परिसरात धावत्या कारच्या बॉनेटवर गव्याने अचानक उडी मारल्याची घटना घडली. या दुर्घटनेत कारचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कारमधील प्रवासी सुखरूप बचावले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चक्रेश्वर वाडी येथील बांधकाम व्यावसायिक तरुण स्वप्निल शिवाजी भांदिगरे हे आपल्या बंधू राजेंद्र यांच्यासोबत गुडाळ येथे मित्राकडे जेवणासाठी गेले होते. रात्री गावी परतत असताना खिंडीचा माळ येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या उंच बांधावरून गव्याने थेट त्यांच्या स्विफ्ट कार च्या बॉनेटवर उडी घेतली.
गवा कारवर कोसळल्याने बॉनेटचे मोठे नुकसान झाले तसेच समोरील काच फुटली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे चालक व त्यांच्या भावाची भीतीने गाळण उडाली. विशेष म्हणजे, ही कार अवघ्या चार महिन्यांपूर्वीच खरेदी करण्यात आली होती. दरम्यान, वन विभागाने या घटनेचा पंचनामा करून संबंधितांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी चक्रेश्वरवाडीचे सरपंच सदाशिव भांदिगरे यांनी प्रादेशिक वनविभागाकडे केली आहे.