कोल्हापूर

Kolhapur Accident : गव्याची दुचाकीला जोरदार धडक; कसबा तारळे-दुर्गमानवाड मार्गावर तिघे जखमी

पुढारी वृत्तसेवा

गुडाळ : कसबा तारळे-दुर्गमानवाड रस्त्यावर पाडळकर माळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळावर गव्याने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी वरील तिघेजण जखमी झाल्याची दुर्घटना सोमवारी (दि. २) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. बळवंत ज्ञानू परीट रा.घानवडे( ता.करवीर ), संस्कार सुरेश पाटील (वय १८, रा. तळगाव ) आणि ओंकार शिवाजी काटाळे (वय १८, रा. भुजंग पाटीलवाडी) अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, या मार्गावर एका शेतकऱ्याच्या जमीन सपाटीकरणाचे काम सुरु असून दिवसभराचे ट्रॅक्टर चे काम संपवून हे तिघेजण तळगावला चालले होते. पाडळकर माळावर आल्यावर बाजूच्या जंगलातून अचानक रस्त्यावर आलेल्या एका मोठ्या गव्याने दुचाकीला जोराची धडक दिली.

यात बळवंत परीट यांना गंभीर दुखापत झाली तर संस्कार आणि ओंकार किरकोळ जखमी झाले. तिघांवर ही तारळे येथील खाजगी इस्पितळात प्रथमोपचार करून राधानगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गव्याच्या धडकेत मोटरसायकलचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रादेशिक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT