करंजफेण : सावर्डी (ता. शाहूवाडी) येथे शेताकडे निघालेल्या शेतकरी दाम्पत्यावर गव्याने केलेल्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली.
गौळवाडा येथील शेतकरी आनंदा गणपती राऊत (वय 60) हे पत्नी संपदा (55) यांच्यासह सावर्डी येथील कोनमळा नावाच्या शेतात गुरुवारी सकाळी औषध फवारणीसाठी निघाले होते. शेतातील पायवाटेवरून जात असतानाच दबा धरून बसलेल्या रानगव्याने त्यांच्या दुचाकीवर जोरदार हल्ला केला. दोघेही दुचाकीसह जमिनीवर कोसळले. आनंदा जोरात ओरडल्याने गवा माघारी फिरला. या अनपेक्षित हल्ल्यात संपदा यांच्या हात आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर आनंदा यांनाही किरकोळ मार बसला. परिसरातील नागरिकांनी जखमींना उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, करंजफेण येथे दाखल केले. संपदा यांच्या डोक्याला झालेली दुखापत गंभीर असल्याने त्यांना सीपीआर रुग्णालयात हलविले.
वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी
सावर्डी, करंजफेण आणि परिसरातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून वन्यजीवांचा वावर वाढला आहे. वन विभागाने या परिसरात गव्यांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि जखमी शेतकर्यांना योग्य ती भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.