विशाळगड : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटात मध्यरात्री जयगडहून कोल्हापूरच्या दिशेने 18 टन गॅस घेऊन जाणारा टँकर शासकीय विश्रामगृहाजवळ उलटला. यात चालक महेश संतोष अनभुले (वय 23, रा. घुमरी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) याचा टँकरखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. सुदैवाने टँकरमधून गॅस गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला.
मंगळवारी रात्री 18 टन गॅस भरलेला एलपीजी टँकर कोल्हापूरकडे जात होता. मध्यरात्री आंबा घाट चढून वर आल्यानंतर चालक महेश लघुशंकेसाठी टँकर थांबवून खाली उतरला. याच दरम्यान टँकर उताराने आपोआप पुढे सरकू लागला. चालकाने धावत जात टँकरवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यापूर्वीच टँकर बाजूच्या चरीत कोसळला आणि चाकाखाली आल्याने चालकाचा जागीच अंत झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वाहतूक बंद करण्यात आली. उलटलेल्या टँकरमधील एलपीजी दुसर्या टँकरमध्ये शिफ्ट करण्यात आला.