Gas pipeline explosion: कर्मचार्‍यांचा हलगर्जीपणा नडला, कष्टाने फुललेला संसार मोडला! Pudhari Photo
कोल्हापूर

Gas pipeline explosion: कर्मचार्‍यांचा हलगर्जीपणा नडला, कष्टाने फुललेला संसार मोडला!

कळंबा परिसरात हळहळ; चिमुरड्यांसह आजोबांचीही मृत्यूशी झुंज

पुढारी वृत्तसेवा
दिलीप भिसे

कोल्हापूर : गणराय आगमनाची लगबग सुरू असतानाच कळंबा (ता. करवीर) येथील मनोरमा कॉलनीत सोमवारी रात्री घरगुती गॅस पुरवठा करणार्‍या पाईपलाईनमध्ये स्फोट होऊन क्षणार्धात भोजणे कुटुंबीयांचे होत्याचे नव्हते झाले. स्फोटात जखमी झालेल्या महिलेचा मध्यरात्री मृत्यू झाला. वृद्ध आजोबांसह दोन चिमुरडी भावंडे मृत्यूशी झुंज देत आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर घडलेल्या दुर्घटनेमुळे कळंबा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गॅस जोडणीतील कंत्राटी कामगारांचा हलगर्जीपणा भोजणे कुटुंबीयांच्या जीवावर बेतला. या घटनेमुळे कळंब्यासह परिसरातील गॅस कनेक्शनधारकांचे टेन्शन वाढले आहे.

अमर भोजणे मूळचे कोकणातील देवरूख येथील. सामान्य कुटुंबात वाढलेले भोजणे यांनी कळंबा जेल परिसरात पाच वर्षांपूर्वी छोटासा टुमदार बंगला बांधला. हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करणार्‍या भोजणे यांना इशिका (3 वर्षे), साडेपाच वर्षाचा प्रज्वल ही दोन मुले. पत्नी शीतल (29) व वडील अनंत भोजणे (60) असे आटोपशीर कुटुंब. खाऊन-पिऊन सुखी असलेल्या या कुटुंबाला द़ृष्ट लागली. घरगुती गॅस जोडणीमधील मानवी चुकांमुळे कष्टाने उभारलेल्या भोजणे कुटुंबीयांच्या घराची अक्षरश: वाताहत झाली.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कळंब्यासह उपनगरांमध्येही घरगुती वापरासाठी वापरल्या जाणार्‍या गॅस जोडणीचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. परप्रांतीय कामगाराकडून भूमिगत पाईपलाईन घरातील स्वयंपाक खोलीपर्यंत जोडण्यात येत आहे. अमर भोजणे यांच्या घरात सोमवारी सायंकाळी साडेसातला गॅस पुरवठा करणारी पाईपलाईन जोडण्यात आली; मात्र पाईपलाईनचे काम अपूर्ण अवस्थेत असताना गॅस पुरवठा करणारी यंत्रणा बंद करणे अत्यावश्यक होती. जोडलेल्या पाईपलाईनमधून गॅस पुरवठा बंद करण्याऐवजी चालूच ठेवल्याने ही दुर्घटना घडली असावी, असा तपास यंत्रणांचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

रात्री जेवण झाल्यानंतर भोजणे कुटुंबीयांची आवराआवर सुरू झाली. दरवाजे, खिडक्या बंद करून शीतल भोजणे स्वयंपाक खोलीत काम करीत होत्या. मुले इशिका व प्रज्वल हे दोघे आजोबा अनंत याच्यासमवेत हॉलमध्ये खेळत होते. स्वयंपाक खोलीतील खिडक्या बंद राहिल्याने अचानकपणे गॅसचा स्फोट झाला. आगीच्या ज्वालात शीतल वेढल्या गेल्या, तर दोन लहान मुले आणि वृद्ध सासरेही भाजून जखमी झाले. मुलांसह सासर्‍यांना गंभीर इजा झाल्याचे लक्षात येताच वेढलेल्या आगीतून त्या बाहेर पळत आल्या. मुलांसह सासर्‍यांना वाचविण्याच्या प्रयत्नात त्या स्वत:च कोसळल्या. यावेळी कानठळ्या बसणार्‍या आवाजामुळे शेजारी राहणारे नागरिक मदतीला धावून आले. शीतल यांच्यासह मुलांच्या अंगावर चादर टाकून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला गेला; पण चौघेही भाजून गंभीर जखमी झाले होते.

कर्मचार्‍यांचा हलगर्जीपणा भोजणे कुटुंबाच्या जीवावर

स्फोटात जखमी झालेल्या चौघांनाही नागरिकांनी खासगी वाहनातून शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र प्रकृती चिंताजनक बनलेल्या महिलेचा मध्यरात्री मृत्यू झाला. कंपनीतील कर्मचार्‍यांचा हलगर्जीपणा कष्टातून संसार फुलविलेल्या भोजणे कुटुंबाच्या जीवावर बेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT