गांधीनगर : सरनोबतवाडी (ता. करवीर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमानीला लागून असलेल्या विकास ट्रक बॉडी रिपेअर मोटार गॅरेजला भीषण आग लागली. या आगीत कोकणातून दुरुस्तीसाठी आलेला ट्रॅक जळून खाक झाला, तर शेजारील ए वन मोटर गॅरेजलाही आग लागली. त्यामधील ट्रकही जळाला आहे. प्रतिभानगर व कावळा नाका येथील फायर फायटर स्टेशनच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवले.
विकास ट्रक बॉडी रिपेअर गॅरेजमधील सर्व बॉडी रिपेअरमधील साहित्यासह ट्रॅक जळून खाक झाला. येथे 25 ते 35 लाखांचे नुकसान झाल्याचे मालक मनोहर सुतार व महेश सुतार (रा. उजळाईवाडी) यांनी सांगितले. ए वन मोटर गॅरेजचे अकबर पठाण यांच्या गॅरेजसह तेथील ट्रकचे नुकसान झाले आहे.
आगीचे लोट आसपासच्या लोकवस्तीत पसरल्याने नागरिकांत घबराट पसरली. फायटर अग्निशमन जयवंत खोत, वाहन चालक संदीप पाटील, संदीप उन्हाळकर, फायरमन अनिल बागूल, अजित मळेकर, आकाश जाधव, हर्षल माने, प्रमोद मोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, तर गांधीनगर पोलिस ठाण्यात मनोहर सुतार यांनी वर्दी दिल्यानंतर पोलिसांनी गॅरेजचा पंचनामा केला.
मुलांना काढले सुखरूप बाहेर
सोमवारी गॅरेजला सुट्टी असते. सकाळीच साडेसात वाजता ही आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत शेजारील चार बंगल्यातील मुलांना सुखरूप बाहेर काढले. आगीमुळे ही मुले भयभीत झाली होती. त्यांनी एकच आरडाओरडा सुरू केला होता.