कोल्हापूर : लाडक्‍या बाप्पाला निरोप देण्यासाठी उसळलेली कोल्हापूरकरांची गर्दी.  
कोल्हापूर

Ganpati Visarjan | बाप्पाला निरोप; प्रशासकीय नियमांची ऐशीतैशी

साऊंड सिस्‍टीमचा दणदणाट; १५ मंडळांच्या आवाजाचे नमुने; दहाजणांनी मर्यादा ओलांडली

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गेले ११ दिवस विघ्नहर्त्या गणरायाची मनोभावे सेवा करणाऱ्या कोल्हापूरकरांच्या भक्तीचा महासागर शुक्रवारी उसळला. या अलोट जनसागराने प्रचंड उत्साहात लाडक्या बाप्पाला भक्‍तिभावे निरोप दिला. मात्र, विसर्जन मिरवणुकीत नियमांची ऐशीतैशी झाली. दिवसभर पारंपरिक वाद्यांचा गजर सुरू होता. सायंकाळनंतर रात्री बारापर्यंत नुसता साऊंड सिस्‍टीमचा दणदणाटच सुरू होता.

रंगीबेरंगी आकर्षक लाईटस्‌ इफेक्टस्‌नी उजळलेला महाद्वार रोड व तरुणाईच्‍या जल्लोषात रात्री बारा वाजेपर्यंत मिरवणूक मार्ग चैतन्यदायी वातावरणाने भारून गेला होता. महिलांचाही उदंड सहभाग असलेल्या या विसर्जन मिरवणुकीची २४ तासांनी सांगता झाली. १५ मंडळांच्या साऊंट सिस्‍टीमच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी दहा मंडळांनी आवाजाची मर्यादा ओलांडल्याचे आढळले. त्यांच्यावर दोन दिवसांत कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. मिरवणूक मार्गात सायंकाळी सहापासून रात्री बारा वाजेपर्यंत प्रचंड गर्दी होती. यामुळे अनेक ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांना चारवेळा सौम्य लाठीमार करावा लागला. काही मंडळांच्या नियमापेक्षा जादा ट्रॉली, साऊंड सिस्‍टीमचे मिक्सर जप्त केले गेले. गणेशमूर्ती पुढे नेण्यावरून मंडळांचे कार्यकर्ते व पोलिसांत वादही झाले.

मंडपातील देखावे ठरले मिरवणुकीतीलही आकर्षण

गणेशोत्सवात मंडपांमध्ये साकारलेले देखावे आणि मूर्ती विसर्जन मिरवणुकीतही आणल्याने त्यांना नव्याने आकर्षण प्राप्त झाले. विविध मंडळांनी मंडपातील वैशिष्ट्यपूर्ण देखावे मिरवणुकीत सहभागी करून घेतले. त्यामुळे मिरवणूक मार्गावर पारंपरिक व आधुनिक संकल्पनांचे दर्शन घडले. शिवाजी पेठेतील नाईट कट्टा तरुण मंडळाने मंडपात साकारलेला मयुरावर विराजमान गणपतीचा देखावा मिरवणुकीतही आणला होता. या देखाव्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. चाणक्य मित्र मंडळाचा डायनासोरचा देखावाही मिरवणुकीत सहभागी झाला होता.

पाचगाव येथील शिवनेरी कॉलनी मंडळाने साकारलेला पार्वती बाल गणेशाच्या कानात बाळी घालत असल्याचा देखावा मिरवणुकीत आणण्यात आला. छत्रपती शिवाजी उद्यमनगर येथील शांतीदूत कला-क्रीडा मंडळाने साकारलेली १८ फुटी ‘सीतेची अग्निपरीक्षा’ ही भव्य मूर्तीही मिरवणुकीतील प्रमुख आकर्षण ठरली. दिलबहार मंडळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेली जोतिबाची भव्य प्रतिकृती तसेच सासनकाठी मिरवणुकीत सहभागी करण्यात आली. शिवाजी पेठेतील कोंडेकर गल्ली परिसरातील शाहू फ्रेंड सर्कलला यंदा ५० वर्षे पूर्ण झाली. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त साकारलेली राधाकृष्ण रूपातील गणेशमूर्ती आणि देखावा मिरवणुकीत आकर्षण ठरला. मंडपातून मिरवणुकीपर्यंत आलेल्या या देखाव्यांमुळे विसर्जन सोहळ्याला वैविध्यपूर्ण रंगत आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT