कोल्हापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त कर्तव्यपथावर यंदा ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर होणार आहे. या पथसंचलनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज झाला असून यंदा राज्याच्या वतीने ‘गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला जाणार आहे. या चित्ररथात कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांतील 20 कलाकार सहभागी होणार आहेत.
युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन हे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत संचलनात सहभागी होणारा महाराष्ट्राचा हा चित्ररथ राज्याची प्रदीर्घ परंपरा आणि वाढत्या आर्थिक सामर्थ्याचे दर्शन अवघ्या जगाला घडवणार आहे.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून होणारी कोट्यवधीची आर्थिक उलाढाल, मूर्तिकार आणि सजावट कलाकारांना मिळणारा शाश्वत रोजगार आणि त्यातून विणली गेलेली आर्थिक साखळी या चित्ररथाच्या केंद्रस्थानी आहे. राज्य शासनाने 2025 पासून सार्वजनिक गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’चा दर्जा दिला आहे. गणेशोत्सवातून केवळ सांस्कृतिकच नव्हे, तर पर्यावरणीय आणि आर्थिक आत्मनिर्भरतेसही कशी चालना मिळते, हे या चित्ररथातून दाखवण्यात आले आहे.
या चित्ररथासमवेत कर्तव्यपथावर सहभागी होण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने पश्चिम महाराष्ट्रातील कलाकारांना संधी दिली आहे. खासदार उदयनराजे भोसले, सातार्याचे नगरसेवक पंकज चव्हाण, चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, सचिव किरण कुलकर्णी आदींचे यासाठी सहकार्य मिळाले आहे.
लाल किल्ल्यावरील भारत पर्व महोत्सवातही चित्ररथ ठरणार आकर्षण
भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाद्वारे 26 ते 31 जानेवारी या कालावधीत लाल किल्ल्यावर भारत पर्व महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात कर्तव्यपथावरील पथसंचलन झाल्यानंतर हा चित्ररथही सहभागी होणार आहे.