कोल्हापूर : राजारामपुरी येथील काटकर कॉलनीत घरातून गांजा तस्करी करणाऱ्या तरुणाच्या घरावर राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी छापा टाकला. अनिकेत संतोष चौगुले (वय २०, रा. काटकर कॉलनी, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. चौकशीत सोलापुरातील गांजापुरवठा करणाऱ्या तस्कराचे नाव निष्पन्न झाले आहे. संशयिताकडून गांजा खरेदी करणाऱ्या १० जणांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांचीही झाडाझडती घेण्यात आली.
संशयिताच्या घर झडतीत अडीच किलो तयार गांजा, १ लाख २० हजारांचा मोबाईल, इलेक्ट्रानिक्स वजनकाटा असा १ लाख ७१ हजार २४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. न्यायालयाने संशयिताला पोलिस कोठडी दिली आहे. चौकशीत गांजा उलाढालीशी संबंधित स्थानिक तस्करांची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे, असे पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले.
बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला अनिकेत रिकामटेकडा आहे. सोलापूर येथील गांजा तस्करांशी संपर्क साधून त्याने राजारामपुरी येथील काटकर कॉलनीतील घरातून गांजा विक्रीचा धंदा सुरू केला. काही दिवसांपासून बेधडक उलाढाल होत होती. पोलिस निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक रूपेश इंगळे, हवालदार अमोल पाटील यांना सुगावा लागला. पथकाने घरावर छापा टाकून गांजा साठ्यासह १ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
गांजा ओढणाऱ्यांची यादी पोलिसांच्या हाती
चौकशीत सोलापूर येथील पुरवठादार तसेच संशयिताकडून नियमित गांजा खरेदी करणाऱ्या १० जणांची यादीच पोलिसांना सापडली. सर्वांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांची झाडाझडती घेण्यात आली. संबंधितांना नोटीस बजाविण्यात आल्याचेही तपासाधिकाऱ्यांनी सांगितले.