खुन्नस अन् ईर्ष्येतून थेट मर्डर Pudhari File Photo
कोल्हापूर

कोल्हापूर शहरात भडकलंंय गँगवॉर; कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे

गांजाचा झुरका, दारूचा घोट; खुन्नस अन् ईर्ष्येतून थेट मर्डर

पुढारी वृत्तसेवा

सतीश सरीकर

कोल्हापूर : एखादी क्वॉर्टर मारायची. त्यावर गांज्यांचे झुरके ओढायचे. मग चिलटासारख्या पोरांनाही हत्तीचं बळं येतं. कशाचंही भान राहात नाही. फक्त एकच, समोरच्याला मारायचा. नुसतं संपवायचा नाही तर जनावर तोडल्यासारखा तोडायचा. मिसरूडही न फुटलेल्या पोरांकडून कायदा व सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे काढले जात आहेत. खुन्नस, ईर्ष्या, पूर्ववैमनस्य, टोळीयुद्ध, सूडचक्र अन् अमली पदार्थांमुळे कोल्हापूरसह इचलकरंजी आणि जिल्ह्यातील शहरी भागात हे नित्याचेच चित्र बनले आहे. पोलिसांनी हाताची घडी, तोंडावर बोट असे धोरण स्वीकारल्याने गुंडांना कोण विचारणारे नसल्यासारखी स्थिती आहे. मात्र नागरिक दहशतीखाली जगत आहेत. जिल्ह्यात सहा महिन्यांत 30 खून झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.

काही वर्षापूर्वीपर्यंत कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातही गुन्हेगारी विश्व होते. परंतु पोलिसांचाही वचक आणि धाक होता. मात्र कालांतराने वरिष्ठांकडूनच हात वर होऊ लागल्याने ज्यांचा वचक होता ते पोलिस अधिकारी आणि कर्मचारीही हतबल झाले. ज्याने केले त्यानेच निस्तरायचे या वृत्तीमुळे पोलिसांचेही हात बांधले गेले. काही प्रकरणांत पोलिसच गुन्हेगार बनले. त्यामुळे आता जिल्ह्यात पोलिस आहेत की नाहीत, अशी परिस्थिती आहे. कुख्यात टोळ्यांच्या दहशतीमुळे कायदा-सुव्यवस्था धाब्यावर बसविली जात आहे. मोका लावला तरी गुंड पोलिसांना आव्हान देत आहेत. राजकीय वरदहस्त असल्यानेच गुंडांचीही इतकी मजल गेली आहे. परिणामी गुन्हेगारी विश्व भयावह पद्धतीने फोफावत आहे.

कुणीही यावे, खून करून निघून जावे

कोल्हापुरात सुमारे 64 झोपडपट्ट्या आहेत. इचलकरंजीतही झोपडपट्ट्या आहेत. मोठ्या प्रमाणात कामगारवर्ग आहे. गेल्या काही वर्षांत गुन्हेगारीत वाढ होत आहेत. कोपर्‍यांवर, कट्ट्यावर बसलेले तुण फक्त बघण्याच्या बहाण्याने एकमेकांवर तुटून पडत आहेत. नंग्या तलवारी फिरविल्या जात आहेत. खून का बदला खून म्हणून डबल मर्डर घडत आहेत.

कळंबा जेलमधून गुन्हेगारी विश्व विस्तारते

कळंबा कारागृहातही गुन्हेगारांच्या जीवनाला वेगळीच कलाटणी मिळते. सराईत गुन्हेगारांच्या सानिध्यात गेल्याने त्यांचेही गुन्हेगारी विश्व विस्तारत आहे. एकमेकांना सहकार्य म्हणून गेममध्ये त्यांचा वापर केला जात आहे. यातूनच आर. सी. गँग, एस. टी. गँग, जर्मनी गँगसह इतर टोळ्यांचा उदय होत आहे.

4 एप्रिल 2024

स्थळ : रंकाळा

गुंड अजय ऊर्फ रावण दगडू शिंदे (वय 25, रा. यादवनगर) याचा रंकाळा येथे नागरिकांच्या वर्दळीत एडक्याने सपासप वार करून खून करण्यात आला. अजयला मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गुंड एकमेकांना कसे तोडतात याचा तो भीतिदायक व्हिडीओ होता. राज संजय जगताप (वय 21), आकाश आनंदा माळी (21), सचिन दिलीप माळी (18), रोहित अर्जुन शिंदे (20), निलेश उत्तम माळी (21), गणेश सागर माळी (18), प्रशांत संभाजी शिंदे, निलेश बाबर आदींनी अजयला टोळीयुद्धातून संपविला.

2 जून 2024

स्थळ : कळंबा कारागृह

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी मुन्ना ऊर्फ मोहमद अलिखान ऊर्फ मनोजकुमार भवरलाल गुप्ता (59) हा कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. गांजा आणि त्यासंदर्भातील आर्थिक वादातून त्याचा खून करण्यात आला. न्यायाधीन बंदी सौरभ विकास सिद, मोका बंदी बबलू ऊर्फ संदीप शंकर चव्हाण, मोका बंदी प्रतिफ ऊर्फ पिल्या सुरेश पाटील, मोका बंदी ऋतुराज ऊर्फ डेज्या विनायक इनामदार, न्यायाधीन बंदी दीपक नेताजी खोत यांनी ड्रेनेजवरील सिमेंट व लोखंडी झाकणाने हा खून केला.

13 जून 2024

स्थळ : टिंबर मार्केट

टिंबर मार्केट परिसरात शहाजी वसाहत येथे गुंड सुजल बाबासो कांबळे (19) याचा खून झाला. ओमकार ऊर्फ मुकुंद राजेंद्र पोवार (19), श्रवण बाळासाहेब नाईक (18), पार्थ राजेंद्र कळके (19), आशिष ऊर्फ आशा ब—ँड सुकेश भाटकर (19), आदित्य आनंदा पाटील ऊर्फ जर्मनी (21), सादिक जॉन पीटर (19), सुमित स्वार्थीक कांबळे, शोएब ऊर्फ कोहिनूर सिकंदर शेख यांनी सुजलवर एडका, कोयता आणि तलवारीने सपासप

वार करून संपविला.

गेल्या काही वर्षातील खून असे...

सन 2020 - 46

सन 2021 - 50

सन 2022 - 47

सन 2023 - 48

सन 2024 - 30 (जून अखेर)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT