कोल्हापूर : व्यावसायिक स्पर्धेतून पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारी टोळीला सुपारी देऊन रंकाळा परिसरातील व्यावसायिक फोटोग्राफरला निर्जन ठिकाणी बोलावून बेदम मारहाण व लूटमार करणाऱ्या म्होरक्यासह टोळीतील सहा साथीदारांना जुना राजवाडा पोलिसांनी रविवारी बेड्या ठोकल्या. संशयितांकडून अत्याधुनिक कॅमेरा, तीन दुचाकींसह 6 लाख 48 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. वारे वसाहत येथील एका मंदिरात ‘सुपारी’चा सौदा ठरल्याचे चौकशीत उघड झाले आहे.
यश खंडू माने (वय 19, रा. वारे वसाहत, मंगळवार पेठ, कोल्हापूर), महम्मदकैफ अल्लाउद्दीन हैदर (19, रा. वारे वसाहत), सिद्धेश संतोष पांडव (19, रा. सुभाषनगर, कोल्हापूर), राहुल बाबासाहेब कोरवी (23, रा. वडर झोपडपट्टी, जवाहरनगर, इचलकरंजी), पृथ्वीराज संजय कदम (20, रा. जुना बुधवार पेठ), रोहित रतन बिरजे (23, रा. जुना बुधवार पेठ, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. टोळीत एका अल्पवयीन संशयिताचाही समावेश आहे.
यश माने, राहुल कोरवी पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. टोळीतील सहाही संशयितांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीचा आदेश झाला आहे. रंकाळा तलाव, इराणी खण परिसरात क्रशर चौकात शुक्रवारी (दि. 2) हा प्रकार घडला. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी म्होरक्यासह टोळीतील अल्पवयीन संशयितांसह सातही जणांचा छडा लावून त्यांना जेरबंद केले.
स्टुडिओ ओस पडल्याने खुन्नस!
पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, मूळचा शाहूवाडी तालुक्यातील सूरज विजय गोडसे (23, रा. महालक्ष्मीनगर, शाहूवाडी) या तरुणाने रंकाळा तलावासमोर मॉलजवळ स्वत:चा स्टुडिओ सुरू केला आहे. अत्याधुनिक कॅमेऱ्यासह व्हिडीओची अन्य कामे करून देत असल्यामुळे प्रतिस्पर्धी व्यावसायिक फोटोग््रााफर राहुल कोरवी याच्या कामावर परिणाम झाला होता. गेल्या काही दिवसांपासून त्याचा स्टुडिओ ओस पडला होता. त्यामुळे गोडसे याच्याविषयी कोरवी याच्या मनात खुन्नस निर्माण झाली होती.
सुपारी 20 हजारांची... हातात पडले अवघे सहा हजार रुपये
गोडसेला अद्दल घडविल्याशिवाय आपला धंदा चालणार नाही, या हेतूने त्याने सराईत गुन्हेगार यश माने याच्यासह त्याच्या साथीदारांना सुपारी दिली. वारे वसाहत येथील एका मंदिरात कोरवी, यश माने व साथीदारांची बैठक झाली. त्यात 20 हजारांच्या ‘सुपारी’चा सौदा ठरला. त्यापैकी 6 हजार रुपये रोख देण्यात आले. काम फत्ते झाले की, सुपारीची उर्वरित रक्कम देण्याचे ठरले.
इराणी खणीजवळ बोलावून लूटमारीचा प्लॅन
संशयित पृथ्वीराज कदम, रोहित बिरजे यांनी गोडसे याच्याशी संपर्क साधला. फोटोग््रााफीसह शूटिंगच्या कामासाठी गोडसे याला क्रशर चौक, इराणी खणीजवळ बोलावून घेतले. गोडसे कामगार आतिश हाटकरसमवेत आला. शूटिंगच्या तयारीने दोघेजण इराणी खणीजवळ आल्यानंतर काही क्षणात संशयित यश माने, महम्मदकैफ हैदर,पांडव तसेच अल्पवयीन संशयित दुचाकीवरून आले.
चाकूचा धाक दाखवून फिर्यादीला बेदम मारहाण करून लुटले
संशयितांनी गोडसेसह कामगाराला गराडा घातला. चाकूचा धाक दाखवून बेदम मारहाण केली. त्याच्या ताब्यातील अत्याधुनिक महागड्या कॅमेऱ्यासह 4 लाख 35 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन संशयित पसार झाले. या घटनेनंतर गोडसे याने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन संशयितांविरुद्ध लूटमारीसह दरोड्याचा गुन्हा दाखल केला.
पोलिस निरीक्षक किरण लोंढे, हवालदार प्रशांत घोलप, सागर डोंगरे, प्रवीण सावंत, अमर पाटील यांनी संशयित टोळीचा छडा लावून सातजणांना जेरबंद केले. संशयितांकडून तीन दुचाकी, महागड्या कॅमेऱ्यासह 6 लाख 48 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.