Ganeshotsav toll free pass
राजकुमार बा. चौगुले
पेठवडगाव: गणेशोत्सवासाठी मुंबई आणि पुण्यातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना यंदाही महामार्गावरील टोलमाफीची मोठी दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. ही सवलत शनिवारी (दि. २३ ऑगस्ट ते सोमवार (दि. ८ सप्टेंबर या कालावधीत लागू असेल. या उपक्रमामुळे सुमारे १५,००० हून अधिक वाहनांना लाभ होण्याची शक्यता आहे.
दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात लाखो कोकणवासीय कामधंद्याच्या व्यस्ततेतही गावी परततात. मात्र मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवासातील विलंब, खराब रस्ते आणि टोलचे ओझे यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हे लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी चाकरमान्यांना टोलमाफीची घोषणा केली आहे.
ही सवलत कार, जीप आणि एसटी बसेससह कोल्हापूरमार्गे किंवा पुण्यामार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना लागू होईल. यासाठी वाहनधारकांनी स्थानिक पोलीस ठाणे किंवा प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी करून ‘गणेशोत्सव २०२५-कोकण दर्शन’ हे स्टीकर घ्यावे लागेल.
पुणे-चिपळूण मार्गावरील वाहने कराड-पाटण मार्गे रत्नागिरी, राजापूरकडे
देवगड, कणकवलीकडे जाणारी वाहने कोल्हापूर-गगनबावडा मार्गे करूळ घाटातून
कुडाळ, मालवण, सावंतवाडी, गोवा आणि कर्नाटकाकडे जाणारी वाहने आजरा-आंबोलीमार्गे
या कालावधीत किणी (जि. कोल्हापूर) आणि तासवडे (जि. सातारा) यांसह अनेक टोल नाक्यांवरून पासधारक वाहनांना टोलमुक्त प्रवेश मिळेल.
तथापि, पुणे-बंगळूर महामार्गावर रुंदीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने आणि पावसामुळे खड्डे पडल्याने वाहतुकीत अडचणी येऊ शकतात. महामार्ग पोलिस आणि स्थानिक पोलीस यंत्रणेला वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.