कोल्हापूर : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषारोप दाखल झालेल्या राजारामपुरी येथील गणेश तरुण मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षासह चौघांना एक वर्ष कारावास आणि प्रत्येकी 15 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती पंकज रजपूत यांनी शिक्षा सुनावली. शिक्षा झालेल्यांत मंडळाचे अध्यक्ष योगेश दीपक मोहिते, उपाध्यक्ष कुणाल हितेंद्र पाटील, सचिव इंद्रजित सर्जेराव निंबाळकर, खजिनदार पंकज श्रीरंग चौगुले (रा. बारावी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर) यांचा समावेश आहे. तत्कालीन शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांच्या आदेशानुसार योगेश मोहिते यांच्यासह 6 जणांवर 2017 मध्ये जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. जुना राजवाडा पोलिसांनी 6 जणांवर दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील सविता पाटील यांनी काम पाहिले.