कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या सदरेवर प्रतिष्ठापित करण्यात येणारी श्री महालक्ष्मी भक्त मंडळाची पारंपरिक गणेशमूर्ती.  (छाया : मिलन मकानदार)
कोल्हापूर

Ganeshotsav 2026 | मांगल्य अन् चैतन्याचा गणेशोत्सव आजपासून

बारा दिवस उत्साहात घुमणार ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : मांगल्‍याची अनुभूती, भक्तीचा दरवळ आणि चैतन्याची उधळण घेऊन येणाऱ्या गणेशोत्सवाला सोमवारपासून (दि. १४) प्रारंभ होत आहे. कोल्हापूर नगरी सज्ज झाली असून घराघरांत गणेशमूर्तीच्या स्वागताची लगबग पूर्ण झाली आहे. उंबरठ्यावर रांगोळ्या, दाराला तोरणे आणि पूजेच्या साहित्याने सजलेली देवघरे अशा मंगल वातावरणात ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष पुढचे १२ दिवस अखंड घुमणार आहे.

घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवासाठी प्रत्येकाचाच उत्साह ओसंडून वाहत असून ढोल-ताशांचा निनाद आणि बाप्पांच्या जयघोषाने शहरातील वातावरण भक्तिमय होणार आहे. प्रत्येकाच्या मनात बाप्पांच्या आगमनाची ओढ आहे. सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाचे वरदान घेऊन येणाऱ्या गणरायाच्या चरणी कोल्हापूर भक्तिभावाने नतमस्तक होईल.

बाजारपेठेत खरेदीला उधाण

बाप्पांची मूर्ती खरेदीपासून ते सजावट, आरास, पूजा साहित्य, फुले, फळे व नैवेद्याचे साहित्य खरेदीला रविवारी बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत घरोघरी सजावट तर मंडळांच्या मंडपातही तरुणाईकडून तयारीवर अंतिम हात फिरवणे सुरू होते.

प्रतिष्ठापना शुभ वेळ दुपारी १.५१ पर्यंत

यंदा घरगुती गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेसाठी सोमवारी पहाटे ४ वाजून ५० मिनिटांपासून दुपारी १.५१ पर्यंत शुभ वेळ आहे, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली. सोमवारी सकाळी ७ वाजून ६ मिनिटांनी भाद्रपद शुक्ल तृतीयेचा अस्त होणार असला तरी हरितालिका पूजा दुपारी १.४८ पर्यंत करता येणार आहे.

आज हरतालिकेचा उपवास

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी सोमवारी हरतालिका तृतीया साजरी होत आहे. सुवासिनी व युवतींकडून पारंपरिक पद्धतीने हरतालिकेची पूजा, उपवास आणि जागरण केले जाणार आहे. मंगळवारी (दि. १५) उपवासाचे उद्यापन करता येणार आहे. बाजारात पार्वतीची मूर्ती, विविध प्रकारच्या वनस्पती, पत्री, फळे, फुले, शिवलिंग करण्यासाठी वाळू खरेदीला गर्दी होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT