कोल्हापूर : अधूनमधून बरसणार्या पावसाच्या सरी, ढोल-ताशांचा गजर, नेत्रदीपक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, साऊंड सिस्टीमचा दणदणाट आणि हजारो कार्यकर्त्यांचा प्रचंड जल्लोष अशा उत्साही वातावरणात रविवारी रंकाळा वेस येथील गोल सर्कल मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीचे आगमन झाले. तावडे हॉटेल व महामार्ग परिसरात मिरवणुकीसाठी प्रचंड गर्दी झाली होती. याचा फायदा घेत बिनधास्त हुल्लडबाजीही करण्यात आली. काही अतिउत्साही हुल्लडबाजांनी चप्पल फेकीचाही प्रकार केला. यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान, रात्री मुस्कान लॉन येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गणेशाची आरती झाली.
सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तावडे हॉटेल चौक येथे कोल्हापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. साऊंड सिस्टीमवर थिरकण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती. मोबाईलमध्ये बाप्पाची छबी टिपून ती सोशल मीडियावर व्हारल करण्यासाठी चढाओढ सुरू होती.
सायंकाळी पाच वाजल्यापासूनच कार्यकर्ते तावडे हॉटेल चौकात जमले होते. मिळेल तेथे दुचाकी लावल्यामुळे तावडे हॉटेल चौकासह महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. महामार्गाला जोडणार्या सर्व रस्त्यांवर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. शहरातून बाहेर पडणार्या तसेच शहरात येणार्या वाहनांची मोठी कोंडी झाली होती. तावडे हॉटेल ते मुस्कॉन लॉन इतक्या छोट्या आंतराच्या मार्गावर झालेली मिरवणूक सुमारे तीन तास सुरू होती.
साऊंड सिस्टीमवर थिरकण्यासाठी पेठा, उपनगरे व ग्रामीण भागातील टोळकी जमली होती. त्यांनी आपल्या दुचाकी जागा मिळेल तेथे पार्क केल्या होत्या. काहींनी उड्डापुलावरही वाहने लावली होती. तावडे हॉटेल चौकातील बस स्टॉपसह उंच जागी चढून हुल्लडबाजी सुरू होती. यामुळे चेंगराचेंगरीसह धक्काबुक्कीचा प्रकार झाला. यातून काही हुल्लडबाजांकडून चप्पलफेकीचा प्रकार झाला. यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.