कोल्हापूर : पोलिस २४ तास विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी तैनात होते.  (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर

Ganesh Visarjan | मिरवणुकीत पोलिसांचाच आवाज; ४ हजार पोलिस २४ तास रस्त्यावर

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ४ हजार पोलिस २४ तास रस्त्यावर खडा पहारा देत उभे होते. शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून शनिवार सकाळपर्यंत हा बंदोबस्त तैनात होता. रात्री १२ वाजता सर्वच मंडळांचे साऊंड बंद केले. शेवटच्या मंडळाची आरती रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या हस्ते होऊन विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली.

चार हजार पोलिसांचा खडा पहारा

शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून विसर्जन मार्गावर बंदोबस्त तैनात केला होता, हा बंदोबस्त शनिवारी पहाटे ४ वाजेपर्यंत तैनात होता. पोलिस अधीक निलोत्पल महालक्ष्मी चौकात थांबून होते. पोलिस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार, प्रिया पाटील, सुवर्णा पत्की, पोलिस निरीक्षक विकास जाधव, सुशांत चव्हाण, रवींद्र कळमकर, किरण लोंढे यांच्यासह पोलिसांनी मुख्य मार्गावर पहारा ठेवला.

१२ वाजता आवाज बंदच

रात्री १२ वाजता साऊंड बंद करण्याच्या नियमाला मंडळांनीही तितक्याच सकारात्मकतेने प्रतिसाद दिला. १२ वाजता सर्वच मंडळांनी आवाज बंद करून प्रशासनाला सहकार्य केले. पोलिसांनी प्रत्येक मंडळाजवळ ११ वाजल्यापासूनच बंदोबस्त तैनात केला होता.

जास्तीत जास्त मंडळांना प्रवेश

पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी बड्या मंडळांना थेट केबीनमध्ये बोलावून दम भरला होता. जास्तीत जास्त मंडळांना मिरवणुकीत प्रवेश मिळालाच पाहिजे, अशी कडक भूमिका त्यांनी घेतल्याने प्रत्येक मंडळाला २० मिनिटांचाच वेळ दिला होता. यामुळे यंदा मुख्य मिरवणुकीत जास्तीत जास्त मंडळांना प्रवेश मिळाला. रात्री १२ नंतर केवळ १५ ते २० मंडळेच बाकी होती. यामुळे मंडळांनी समाधान व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT