कोल्हापूर : ‘दीनदयाळा, परम कृपाळा, तू लडीवाळा, लागला लळा तव निर्वाळा अन् जिव्हाळा गणेश बाळा रे...’अशा पाळणा गीतासह ‘वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला, प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी सर्व गणेश भक्तांना...’ अशा भक्तिभावाने सर्वत्र गणेश जयंतीचा सोहळा शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला.
बाल गणेशाचा जन्मकाळ सोहळा व पाळणा, महाप्रसाद यासह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले होते. दरम्यान, गणेशाच्या दर्शनासाठी पहाटे पासून ते रात्री उशिरापर्यंत मंदिरांमध्ये गर्दी झाली होती. दुपारी 12 वाजून 17 मिनिटांनी श्री गणेशांचा जन्मकाळ सोहळा झाला. त्यानंतर गणेशाची आरती व मंत्रपठण झाले. गणेश जयंतीच्या मुख्य सोहळ्यानंतर रविवारी आणि सोमवारी बहुतांशी ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गणेश जयंती सप्ताहाची सांगता महाप्रसादाने झाली.शाहूपुरी कुंभार गल्ली येथील पंचमुखी गणेश मंदिर व शुक्रवार पेठेतील न्यू शिवनेरी तरुण मंडळाचे शिवगणेश मंदिरतर्फे पालखी मिरवणुकीचे आयोजन केले होते.
ओढ्यावरच्या सिद्धिविनायक गणेश मंदिरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने गणेश जयंतीचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. पवार कुटुंबीयांच्या वतीने श्री चरणी श्री गणेश पालकारोहणाची सेवा देण्यात आली. यंदा या सेवेचे 51 वे वर्ष होते. सुरेश पवार यांनी काव्यरचना केलेल्या श्री गणेश पालकारोहणाचे गायन स्वरागंगा मराठी वाद्यवृंदाचे दस्तगीर मुजावर व माधुरी तोडकर यांनी केले. यावेळी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, महादेव दिंडे, श्रीपूजक सागर भोरे, भरत पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.