गडहिंग्लज ः‘काळभैरी... बाळभैरी... भैरीच्या नावानं चांगभलं’च्या गजरात महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या काळभैरवाची यात्रा मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडली. यात्रेला सुमारे दीड लाखांहून भाविकांनी हजेरी लावली. त्यामुळे डोंगर परिसर गर्दीने फुलून गेला होता. सोमवारी रात्री पालखी डोंगरावरील मंदिरात दाखल झाली. मध्यरात्री प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडल्यानंतर दर्शनासाठी रात्रीपासूनच गर्दी सुरू झाली.
पहाटेपासून सुरू झालेल्या दर्शनाच्या रांगा दिवसभरातही उन्हात हाऊसफुल्लच होत्या. यात्रास्थळावर रंगीबेरंगी पाळणे, खाऊची दुकाने, खेळण्याची दुकाने, लहान मुलांसाठी विविध खेळ आल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा गर्दीच गर्दी झाली होती. मंदिराकडे जाणारे रस्ते सकाळी दहापासून भरगच्च झाल्यामुळे यात्रा स्थळ गर्दीने फुलले होते. एसटी महामंडळाने खास यात्रेसाठी ज्यादा बसेसची सोय केली होती.
अन्य विविध मंडळांनी यात्रेकरूंची सेवा केली. दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर व बैलगाडीतून भाविक मोठ्या उत्साहात यात्रास्थळाकडे येत होते. एमआयडीसी परिसरात पार्किंगची सोय होती. रात्रीपासूनच नैवेद्यासाठी बकरी, कोंबड्यांसह अनेक भाविक डोंगरावर पोहोचल्याने सर्वत्र गर्दी झाली होती. यात्रा परिसरात स्वयंसेवक दर्शन रांगा सुरळीत करण्यासाठी मदत करत होते. यात्रास्थळावर पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने दर्शनासाठी मोठी झुंबड उडाली. गडहिंग्लजसह बड्याचीवाडी, आजरा तालुक्यातील बहिरेवाडी, कर्नाटकातील हडलगे भागातही यात्रा उत्साहात साजरी झाली.
सबिना निघाला उशिरा
काळभैरी पालखीवेळी झालेल्या वादावादीमुळे या प्रकरणातील लोकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी मानकऱ्यांनी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन कारवाईची मागणी केली होती. यामुळे दुपारी बारा वाजताच सबिना एक वाजल्यानंतर काढण्यात आला. याची मंदिर परिसरामध्ये चर्चा होताना दिसत होती.