गडहिंग्लज; प्रवीण आजगेकर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीसाठी आज (दि. २७) पॅनेल रचना बनविण्यात आली. यंदाची निवडणूक ही गोडसाखरसाठी दुरंगी लढत होणार आहे. यामध्ये विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ व आमदार राजेश पाटील या दोन्ही आमदारांच्यामधील लढतीची चर्चा जोरात सुरू झाली आहे. दरवेळेप्रमाणे यावेळीही धक्कादायक आघाडीची परंपरा कायम राहिली आहे. दरम्यान डॉ.शहापूरकर हे विरोधी गटात सामील होण्याची चर्चा होती. मात्र ते आमदार मुश्रीफ यांच्या पॅनेलमध्ये सहभागी झाले आहेत. मुश्रीफ यांनी डॉ. शहापूरकर हेच पॅनेलप्रमुख राहणार असून त्यांना पाच वर्षे चेअरमनपदाची संधी देणार असल्याचे जाहीर केले आहे. गोडसाखरसाठी एकूण २१६ अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी आज १७३ जणांनी माघार घेतली असून रिंगणामध्ये ४३ जण राहिले आहेत. (Gadhinglaj)
आमदार हसन मुश्रीफ, डॉ.प्रकाश शहापूरकर, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, प्रकाश चव्हाण, अप्पी पाटील, प्रा.किसनराव कुराडे, सदानंद हत्तरकी, अप्पी पाटील, स्वाभिमानीचे राजेंद्र गडडयान्नावर, संग्रामसिंह कुपेकर यांनी एकत्र येऊन छत्रपती शाहू शेतकरी समविचार आघाडी स्थापन केली आहे. (Gadhinglaj)
विरोधी आमदार राजेश पाटील, माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे, माजी उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे, सेवानिवृत्त कामगार संघटनेचे शिवाजी खोत यांची काळभैरव शेतकरी कामगार विकास आघाडी करण्यात आली आहे.
दोन्ही गटांकडून ३८ उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे भाजपाच्या राजेंद्र तारळे व प्रितम कापसे यांनी अपक्ष अर्ज ठेवले असून भाजप कोणासोबत आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. याबरोबरच इतर मागास गटाचे उमेदवार प्रवीण पोवार यांच्या उमेदवारी अर्जाच्या नाट्यमय घडामोडीनंतर अपक्ष म्हणून लढणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच सुरेश कुराडे यांचा महागांव हरळी गटातून तर उर्मिला पाटील यांचा महिला गटातून अर्ज राहिला आहे.
कौलगे कडगांव गटातून शाहू आघाडीतून प्रकाश शहापूकर, विश्वनाथ स्वामी, बाळासो देसाई यांच्याविरोधात काळभैरी आघाडीकडून अशोक देसाई, विकास पाटील, सुजित देसाई लढणार आहेत. गडहिंग्लज हनिमनाळमध्ये शिवराज पाटील, अशोक मेंडुले, अक्षयकुमार पाटील यांच्याविरोधात संग्रामसिंह नलवडे, शिवाजीराव खोत, विजय बाळासाहेब मोरे तर भडगांव मुगळी गटातून प्रकाश चव्हाण, सतिश पाटील यांच्याविरोधात अमरसिंह चव्हाण,बाबासाहेब पाटील भिडणार आहेत.
नूल नरेवाडी गटातून रविंद्र पाटील,सदानंद हत्तरकी यांच्याविरोधात रणजित यादव, वसंतराव चौगुले तर महागांव हरळी गटातून भरमू जाधव, प्रकाश पताडे, विदयाधर गुरबे यांच्याविरोधात बाळकृष्ण परीट, प्रदीप पाटील,संदीप शिंदे हे भिडणार आहेत. उत्पादक गटातून सोमनाथ पाटील यांच्याविरोधात शिवाजीराव खोत तर अनुसुचित जातीमधून काशिनाथ कांबळे यांच्याविरोधात परसु कांबळे यांची थेट लढत होणार आहे. महिला गटातून कविता पाटील, मंगल आरबोळे यांच्याविरोधात शुभांगी देसाई, गीता पाटील यांची लढत होणार आहे. इतर मागास गटातून दिग्वीजय कुराडे यांच्याविरोधात संजय बटकडली रिंगणात असून भटक्या विमुक्तमधून अरूण गवळी विरोधात संभाजी नाईक लढणार आहेत.
हेही वाचा