गडहिंग्लज; पुढारी वृत्तसेवा : पश्चिम घाटातील संततधारेने हिरण्यकेशीच्या पाणीपातळीत वाढ कायम राहिली आहे. रविवारी रात्री चंदगड राज्यमार्गावरील हिरण्यकेशीवरील भडगाव पूल पाण्याखाली गेल्याने या ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली. यामुळे पूर्व भागातील गावांसह चंदगड तालुक्याशी थेट होणारा संपर्क तुटला आहे. दरम्यान, हिरण्यकेशीवरील ऐनापूर, निलजी तसेच घटप्रभा नदीवरील तावरेवाडी ते कानडेवाडी दरम्यानचा बंधारा अद्याप पाण्याखालीच असून, येथील वाहतूक बंदच राहिली आहे.
तालुक्यात रविवारी पावसाची उघडझाप राहिली. दिवसभरात जोरदार सरी कोसळल्या. उगमक्षेत्रासह पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस असल्याने हिरण्यकेशीच्या पाणीपातळीत वाढ कायम राहिली आहे. कोल्हापूर पद्धतीच्या ऐनापूर, निलजी तसेच कानडेवाडी बंधार्यांवरील वाहतूक तीन दिवसांपासून बंदच राहिली आहे. ऐनापूर बंधारामार्गे होणारी आजरा तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांची वाहतूक पर्यायी मार्गे सुरु आहे तर निलजी परिसरातील गावांची वाहतूक जरळीमार्गे सुरू आहे. रविवारी दिवसभरात भडगाव पुलाजवळची पाणीपातळी वाढल्याने चंदगड मार्गावरील गावांची धडधड वाढली होती. घटप्रभेच्या पाणीपातळीतही वाढ कायम राहिली असून, कानडेवाडी बंधारा बंद असल्याने सांबरे परिसरातील गावांचा थेट संपर्क ठप्पच असून, पर्यायी मार्गे त्यांची वाहतूक सुरु आहे.