गडहिंग्लज; पुढारी वृत्तसेवा : गडहिंग्लज युनायटेडचा युवा प्रतिभावान फुटबॉलपटू अभिषेक शंकर पोवार हा संतोष ट्रॉफी राष्ट्रीय स्पर्धेसाठी सौदे अरेबियाला आज रवाना झाला. अत्यंत गरीब बंजारी कुटूंबातील अभिषेकचा कर्नाटकातील गुलबर्गा ते सौदे अरेबियाची राजधानी रिहाद व्हाया गडहिंग्लज हा प्रवास प्रेरणादायी आहे. संतोष ट्रॉफीत पर्दापणातच त्याने अर्धा डझन गोल करून भारतीय फुटबॉल वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. अभिषेकच्या निमित्ताने गडहिंग्लज फुटबॉल केंद्राची दखल व्यावसायिक फुटबॉल संघानी घेतली आहे.
खोदकामाच्या माध्यमातून उदरनिर्वाहासाठी कर्नाटकातील गुलबर्गा, विजापूर जिल्ह्यातील शंभरहून अधिक बंजारी कुटूंबीय याठिकाणी आले आहेत. झपाट्याने विकसित होणार्या गडहिंग्लजमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम क्षेत्र विस्तारत आहे. त्यामुळेच वर्षभर प्रामणिक अंगमेहनत करणार्या कुटूंबियाना रोजगार मिळतो आहे. त्यातच मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय असल्याने हि बंजारी कुटूंबिय याच ठिकाणी स्थिरावली आहेत. त्यातीलच एक शंकर पोवार यांचे कुटुंब होय. अभिषेकच्या यशाने सर्वच बंजारा कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
अभिषेकला एम आर हायस्कूलवरील दिवाळीतील गडहिंग्लज युनायटेडच्या अखिल भारतीय स्पर्धांमुळे फुटबॉलची गोडी लागली. त्याची गती लक्षात घेऊन गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कुलने त्याला दहा वर्षाचा असताना दत्तक घेतले. त्यानंतर काटक आणि चपळ असणारा अभिषेकने मागे वळून पाहिले नाही. शालेय स्तरापासूनच मैदान गाजवायला सुरवात केली. बॅ. नाथ पै स्कूल, गडहिंग्लज हायस्कूल या संघाना त्याने एकहाती स्पर्धा जिंकून दिल्या. चेंडूवरील अफलातून निंयत्रण आणि मैदानभर सतत धावण्याची त्याची क्षमता निर्णायक ठरली.
बेळगाव युनायटेड संघातूनही त्याने बंगळूर अठरा वर्षीय लिगमध्ये गोलचा पाऊस पाडला. यंदाच्या हंगामात बंगळूरच्या किक स्टार्ट एफसीतून त्याने आठ गोल लगावले. या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तो कर्नाटकाकडून संतोष ट्रॉफीसाठी निवडला गेला. दिल्ली आणि भुवनेश्र्वर येथे झालेल्या संतोष ट्रॉफी पात्रता व मुख्य फेरीत त्याने कर्नाटकाकडून अर्धा डझन गोल मारले. खेलो इंडिया स्पर्धेतही त्याने पाच गोल करुन संघाला उपविजेतपद मिळवून दिले. यंदा प्रथमच संतोष ट्रॉफी उपात्यं आणि अंतिम सामना रिहाद येथील किंग फहाद आंतरराष्ट्रीय स्टेडिमयवर आहे. अभिषेकचा बुधवारी (दि.१) रात्री नऊ वाजता सर्विसेस विरूध्द सामना आहे. संतोष ट्रॉफीतील कामगिरीने अभिषेकसाठी केरळ, बंगळूर, कोलकत्ता, चेन्नईतील व्यावसायिक संघानी संपर्क साधला आहे. त्यामुळे गडहिंग्लज फुटबॉल केंद्र चर्चेत आले आहे.
अभिषेक गेल्या मे महिन्यापर्यंत आई वडिलांना खोद कामात मदत करायचा. पहाटे अडीच तास गडहिंग्लज युनायटेडमध्ये सराव आणि दिवसभर कुटुंबियाना मदत असेच त्याचे वेळापत्रक होते. अंगमेहनतीचे काम करूनही न थकता सातत्याने त्याने केलेला सराव त्याला अधिक काटक बनविण्यास कारणीभूत ठरला.
अभिषेकने यंदा स्वप्नवत कामगिरी केली. बालपणापासून गडहिंग्लज युनायटेडने त्याला दिलेल्या पाठबळामुळेच हे शक्य झाले. त्याने उपांत्य फेरीतही विजय मिळवावा हीच सर्वांची अपेक्षा आहे.
– शंकर पोवार, पालक, गडहिंग्लज.