गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत मंगळवारी (दि. ५)पासून अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होत आहे. पाच दिवस चालणार्या या स्पर्धेत महाराष्ट्रासह लगतच्या कर्नाटक, गोवा आणि केरळ राज्यातील चौदा संघ सहभागी आहेत. स्पर्धेसाठी एकूण अडीच लाख रुपयांची पारितोषिके आहेत. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावरील स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे.
एम. आर. हायस्कूल मैदानाची गेले आठवडाभरापासून सुरु असणारी दुरुस्ती पूर्ण झाली. खेळाडूंनी श्रमदानातून माती टाकून खड्डे भरण्यासह रोलरने सपाटीकरण केले आहे. सकाळच्या सत्रात खेळाडूंनी मैदानाची आखणी पूर्ण केली. सायंकाळी स्पर्धेतील मिरज, सोलापूर संघ दाखल झाले. मंगळवारी दुपारच्या सत्रात दोन सामने होणार आहेत. दुपारी दोन वाजता स्पर्धेचा पहिला सामना आहे.
स्पर्धेत गोव्याचे सेसा अकादमी, एफसी गोवा (राखीव) असे दोन संघ असून केरळचा एजीएस त्रिवेंद्रम आणि मुंबईचा बदोडा बँकेसमोर इतरांची कसोटी आहे. कोल्हापूर सम्राटनगर, मिरज जे. एफ., सोलापूर, बेळगाव दर्शन, मंगळूर, निपाणी आणि स्थानिक काळभैरव रोड, यजमान युनायटेड संघ लढणार आहेत. रोज सकाळी दोन आणि दुपारच्या सत्रात दोन असे चार सामने होणार आहेत. उद्या सायंकाळी चार वाजता ज्येष्ठ फुटबॉलपटूंच्या हस्ते, मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन होणार असल्याची माहिती युनायटेडचे अध्यक्ष डॉ. रवींद्र हत्तरकी, उपाध्यक्ष सुरेश कोळकी, समन्वयक सुलतान शेख यांनी दिली.
साठच्या दशकापासून गडहिंग्लजला दिवाळी फुटबॉल स्पर्धेची परंपरा आहे. वाढत्या महागाईमुळे देशभरातील मोठ्या शहरात बहुतांश अशा स्पर्धा इतिहासजमा झाल्या आहेत. पण, गडहिंग्लजकरांच्या लोकवर्गणीच्या जोरावर स्पर्धेने यंदा १९ वे वर्ष गाठले आहे. दरवर्षी दोन महिने देणगी, धान्य संकलनापासून मैदानाची दुरुस्तीपर्यंत पडेल ते काम करून युनायटेडचे फुटबॉलपटू ही परंपरा टिकावी यासाठी मेहनत घेतात. परिणामी, राज्यातीलच नव्हे तर देशातील ग्रामीण भागात भरणारी उत्कृष्ट स्पर्धा असा याचा नावलौकिक झाला आहे.