कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जादा परताव्याच्या आमिषाने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण व गोव्यातील शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक केल्याप्रकरणी बहुचर्चित मेकर अॅग्रो इंडिया प्रा. लि. कंपनीचा फरार संचालक व मार्केटिंग कन्सल्टंट यांना आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी जेरबंद केले. सुरेश चापाजी जुन्नरे (वय 65, रा. रत्नदीप कॉलनी, भांडुप पश्चिम मुंबई) आणि श्रीधर हरिश्चंद्र खेडेकर (55, पिंपळे गुरव, पुणे) अशी संशयितांची नावे आहेत. न्यायालयाने दोघांना पोलिस कोठडी दिली आहे.
दोघांना ताब्यात घेतल्याने आजवर फसवणूकप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या 18 झाली आहे. उर्वरित 5 फरार संचालकांचा पुणे, पालघर याठिकाणी शोध घेण्यात येत आहे. संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला कंपनीचा मुख्य सूत्रधार रमेश महादेव वळसे-पाटील याच्यासह अटक केलेल्या संचालक, एजंटांच्या सुमारे पाच कोटी किमतीच्या मालमत्तांवर टाच आणण्यात आली आहे.
त्यामध्ये स्थावर मालमत्ता 2 कोटी 35 लाख 14 हजार 937 तर जंगम मालमत्ता 2 कोटी 10 लाख तसेच एक लाखाच्या एफडीचा समावेश असल्याचेही कळमकर यांनी सांगितले. फसवणूकप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात 2018 मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या रखडलेल्या तपासावर न्यायालयाने ताशेरे ओढून संशयितांना तातडीने अटक करण्याचे निर्देश दिले होते.
पाच संशयितांचा शोध सुरू
पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी डिसेंबर 2023 मध्ये गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला. पथकाकडून आजवर मुख्य सूत्रधारासह 15 जणांना अटक करण्यात आली आहे. अजूनही 5 संशयित फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.